अत्यल्प पाण्यावर ६० गुंठ्यात ९ टनावर ढोबळी मिरची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 02:53 PM2019-09-10T14:53:37+5:302019-09-10T14:56:24+5:30
शेतशिवार यशोगाथा; अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथील शेतकरी मल्लिनाथ प्रचंडे याची कहाणी
उडगी : सध्याची अवर्षण परिस्थिती पाहता स्वत:च्या शेतीत कोणी नवा प्रयोग करण्याची हिम्मत करत नाही़ नशिबाला दोष देत काही शेतकरी एकीकडे हतबलता व्यक्त करतो तर दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील गळोरगीच्या मल्लिनाथ प्रचंडे या तरुण शेतकºयाने ढोबळी मिरचीच्या माध्यमातून यशस्वी शेती करून दाखवली आहे. केवळ ६० गुंठ्यात आणि अत्यल्प पाण्यावर लाखो रुपयांची ढोबळी मिरचीचे पीक घेतले आहे़ त्यांच्यातील कल्पकता, प्रयोगशीलता आणि कठोर परिश्रमाचे अक्कलकोट तालुक्यातून कौतुक होत आहे़
मल्लिनाथ हे दहावी उत्तीर्ण असून पुढील शिक्षण न घेता १५ वर्षे वाहन चालक म्हणून काम केले. या कामात मन रमत नसल्याने शेती करण्याचा निश्चय केला. शेतीत नवनवीन प्रयोग सुरु केले आणि ते यशस्वीही झाले.
मागील वर्षी ३ एकर मध्ये कलिंगडाचे १५ लाख रुपयांचे फळपीक घेतले़ या प्रयोगानेच त्यांना यू टर्न मिळाला़ यंदा जून महिन्यात मल्लिनाथ यांनी स्वत:च्या ६० गुंठे क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवड केली. मिरचीच्या लागवडपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून घेतली. त्यानंतर बोरामणीतील सचिन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ढोबळी मिरचीची लागवड केली़ पाण्याच्या बचतीसाठी त्यावर ठिबकच्या लॅटरल अंथरल्या़ त्यावर मल्चिंग पेपर अंथरले़ नान्नज येथून बेळगावी पोपटी जातीची ढोबळी मिरचीची १५ हजार रोपे आणली.
ती चार बाय दीड फूट अंतराने लावली़ पिकाच्या संरक्षणासाठी शेडनेटचा वापर केला़ मल्लिनाथला यातून ४० टन ढोबळी मिरची उत्पादनाची अपेक्षा आहे. यातून रोपं, खते, कीडनाशक, ठिबक, वाहतूक, मजुरी असा दोन लाखांचा खर्च वजा करता मल्लिनाथला सात लाखांचा निव्वळ नफा होणार आहे.
पहिल्याच तोडीत निघाली दीड टन मिरची
- लागवडीनंतर ३ पोते डीएपी, २ पोती लिंबोळी पेंड, २ पोती युरिया खत टाकू न दर तीन दिवसांनी कीडनाशक आणि बुरशी नाशकाच्या फवारण्या केल्या. लागवडीनंतर २५ दिवसांनी मिरची तोडणीस तयार झाली. पहिल्याच तोडीला दीड टन ढोबळी मिरचीचे उत्पादन मिळाले़ आठवड्यातून एकदा या मिरचीची तोडणी केली जाते आणि ही मिरची प्लास्टिक पिशवी भरून हैदराबाद बाजारपेठेत पाठवली जातेय. आत्तापर्यंत तीन तोडी झाल्या असून असून त्यातून ९ टन उत्पादन मिळाले आहे. आज किलोमागे २० ते २२ रुपयांचा दर मिळाला असून पुढील दोन ते तीन महिने यातून उत्पादन मिळतराहणार आहे़
योग्य नियोजन, श्रमाची तयारी, सूक्ष्म जलसिंचन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ढोबळी मिरची लागवड केली़ आजच्या परिस्थितीला हतबल न होता योग्य नियोजनावर भरघोस पीक घेऊ शकतो़
- मल्लिनाथ प्रचंडे,शेतकरी, गळोरगी