‘चपाती डे’च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:02 PM2019-07-22T13:02:07+5:302019-07-22T13:03:28+5:30
संडे अँकर; आठवड्यातून एकवेळ गरजूंसाठी, आॅर्किडमध्ये विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून उपक्रम
सोलापूर : वेळ सकाळी पावणे नऊची.. स्थळ एन.के. आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परिसर.. विद्यार्थी महाविद्यालयाच्या व्हॅनमधून.. कुणी बाईकवरुन कॉलेजला येत आहेत... हे सर्व विद्यार्थी आपापल्या डिपार्टमेंटला जात असताना डिपार्टमेंटच्या प्रवेशद्वाराजवळ स्वयंसेवक थांबलेले.. त्यांच्या हातात चपाती कलेक्ट करण्यासाठीची भांडी.. विद्यार्थी आपापल्या डब्यांमधून चपाती काढतात आणि स्वयंसेवकांकडे देतात. हे करताना त्यांच्या चेहºयांवरील आनंदाचे संमिश्र भाव खूप काही सांगून जाणारे. समाजासाठी आपणही काही देणं लागतो या भावनेतून आपला स्वत:चा खारीचा वाटा उचलतानाचे आनंदाचे भाव निश्चितच बरंच काही सांगून गेले.
आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन अॅकॅडमिक प्रा. आय. आय. मुजावर यांना हा विचार सुचला. समाजाचं आपण काही देणं लागतो या सामाजिक बांधिलकीच्या विचारातून हा अनोखा उपक्रम आॅर्किड अभियांत्रिकीमध्ये सुरू झाला आहे. दररोज मुले येत असताना सोबत घरातूनच डब्यामध्ये एक चपाती एक्स्ट्रा आणतात आणि जवळपास तीनशे साडेतीनशे चपात्या सकाळी गोळा होतात.
जयहिंद फूड बँकेचे अध्यक्ष सतीश तमशेट्टी, उपाध्यक्ष विक्रमसिंह बायस व आस्था फाउंडेशनचे जगदीश पाटील व डॉ. विक्रम कारंडे यांचे चपात्या गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे सहकार्य लाभले आहे. आश्रमशाळा, वृद्धाश्रम व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांबरोबर आलेल्या गरजू व्यक्तींना या चपात्या वाटप होताहेत. ही एक चळवळ आहे. या चळवळीमध्ये प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलायचा आहे. आठवड्यातून एक दिवस एक्स्ट्रा चपाती आणणं तसं अवघड नाहीये. सामाजिक उपक्रमातही वेगळेपण जपणारी अशी ही आॅर्किड संस्था या माध्यमातून चपाती डे हा उपक्रम समाजापर्यंत एक मोठा संदेश देणारी चळवळ ठरावी ही भावना आहे.
सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यात हिरीरिने सहभागी होत आहेत. एक सेवाभावी उपक्रम म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. दिवसेंदिवस या उपक्रमाला प्रतिसाद वाढत आहे. अन्नदानातून आत्मिक समाधान मिळते यालाच आजच्या भाषेत हॅपिनेस कोशंट म्हणतात, असे प्रा. मुजावर यांनी सांगितले.
एक चपाती गरजूंसाठी
‘चपाती डे’ हा उपक्रम आॅर्किड अभियांत्रिकीमध्ये सुरू झालाय. ‘एक चपाती’ गरजूंसाठी या माध्यमातून आठवड्यातील एक दिवस प्रत्येक विभागास वाटून दिला आहे. त्या दिवशी त्या विभागातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी दररोजच्या डब्यामध्ये एक चपाती आणतात. ती त्याच दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत गोळा करायची असा हा उपक्रम आहे.
‘चपाती डे’ हा एक सामाजिक उपक्रम आहे, हा उपक्रम आपण सहज राबवू शकतो. तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथे तुम्हाला वाटेल त्या गरजूला तुम्ही घरातील ताजे अन्न देऊन तुम्ही हा उपक्रम साजरा करु शकता. वंचितांसाठी सामाजिक संवेदनेच्या भावनेतून हा उपक्रम केला आहे. असे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येते.
- डॉ. जे. बी. दफेदार
प्राचार्य आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय