समाजवादी संत गाडगे बाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 04:40 PM2019-12-20T16:40:51+5:302019-12-20T16:41:05+5:30
काही माणसे ही ध्येयवेडी असतात. समाजातील काही ध्येयवेड्यांपैकी एक म्हणजे ‘संत गाडगेबाबा’
काही माणसे ही ध्येयवेडी असतात. समाजातील काही ध्येयवेड्यांपैकी एक म्हणजे ‘संत गाडगेबाबा’ सामान्यातून असामान्यापर्यंत ते पोहोचलेले़ स्वत:ची शक्ती, युक्ती, बुद्धी आणि शरीर त्यांनी समाज उद्धाराच्या कार्यावर खर्ची घातली.
त्यांचे नाव कानी पडताच डोळ्यांपुढे आज स्वच्छता अभियान उभे राहते़ त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव (ता़ दर्यापूर) तालुक्यातील परीट समाजात झाला. त्यांच्या आई सखुबाई आणि वडील झिंगराज हे अक्षरशून्य अर्थात अडाणी़ अक्षरगंध नसलेल्या या दांपत्याची देवदेवतांवर नितांत श्रद्धा होती़ पण ती डोळस नव्हती, ती होती अंधश्रद्धा़ मरिआई, लक्ष्मीआई, तुकाई, यमाई, खंडोबा, मसोबा हे त्यांचे आद्य दैवत होते़ कोंबडी, बकरी यांचा बळी देऊन त्यांना नैवेद्य दाखवत़ राहिलेले मांस मटण हे स्वत: खात असत़ मटण म्हटले की दारु आलीच़ याला झिंगराज अपवाद नव्हते़ हळूहळू दारुचे व्यसन वाढले़ घराची राखरांगोळी झाली़ शरीराचं मातेरं झालं.. ते अंथरुणाला खिळून राहिले़ अंतिम इच्छा व्यक्त करण्यासाठी त्यांनी पत्नीला बोलावले अन् म्हणाले़.. सखुबाई माझ्याजवळ बस़ माझा आता भरवसा नाही़ दारुपाई मी कुटुंबाला मुकलोय़ तेव्हा मी काय सांगतो ते नीट ऐक़..आपल्या देवघरात शेंदूर फासलेले दगड-गोटे आताच्या आता बाहेर फे कून दे़ त्याचा वारा आपल्या डेबूला (गाडगे बाबा) लागू देऊ नकोस़ भले देवाला तो न मानणारा निघाला तरी चालेल, असे सांगून त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डेबूजी पित्याला परके झाले़ सखुबार्इंनी डेबूजींना घेऊन माहेर गाठले़ ते हळूहळू आजोळात वाढले़ पडेल ते काम करूलागले़ गायी-गुरांना रानात घेऊन जाऊ लागते़ १५-१६ वर्षांचे होताच त्यांचे लग्न (१८८४) ही झाले़ गाडगे बाबा हे अंगठेबहाद्दर असल्याने त्यांना बरीच मोठी किंमत मोजावी लागली़ तो काळ होता सावकार शाहीचा़ गरजू शेतकरी कर्ज घेत असत़ सावकार डाव्या हाताचा अंगठा करवून घेत आणि १२०० रुपयांच्या कर्जाची नोंद १२ हजार रुपये करायचे़ असेच गाडगे बाबांच्या मामांच्या बाबतीत घडले़एका सावकाराने कर्जापोटी त्यांच्या मामांची शेती घेतली़ हे समजताच गाडगे बाबा हे शेतावर गेले़ नांगरणी, पेरणीही केली़ ही बाब कळताच सावकाराने बाबांना मारण्यासाठी गुंडांना पाठवले़ गाडगे बाबांनी त्यांना चांगलाच हिसका दाखविला़ घाबरलेल्या सावकाराने त्यांच्या मामाकडून घेतलेली कागदपत्रे आणि शेती परत केली़ परंतु आजच्या शेतकºयांची परिस्थिती पाहता तोच काळ डोळ्यांपुढे उभा राहतो अन् आज समाजाला पुन्हा बाबांची गरज वाटते.
हे सारे घडले ते शिक्षणाच्या अभावाने़ गाडगे बाबा म्हणतात, ‘शिक्षणाशिवाय तरणोपायी नाही’़ गरिबांच्या शिक्षणासाठी काही तरी करायचे म्हणून ते घराबाहेर पडले़ संसाराचा त्याग केला़ खेडीपाडी, गावे फिरुन समाज साक्षर करण्याचा प्रयत्न केला़ वºहाडी भाषेतून समाज प्रबोधनाचा वसा पेलला़ ‘आधी केले़़़ मग सांगितले’ ही म्हण आचरणात आणली़ प्रथम त्यांनी हातामध्ये खराटा घेऊन स्वच्छता केली़ कोणालातरी पोहरा मागायचे आणि मुक्या जनावरांना, पशू-पक्ष्यांनाही पाणी पाजायचे़ आजारी समाज पाहून त्यांचे मन हेलावून जायचे़ त्यांना ते रुग्णालयात न्यायचे़ त्यांच्या स्वच्छता मोहिमेमुळे समाज रोगमुक्त राहायचा़ लोक त्यांचा आदर करू लागले़ त्यांची ख्याती दूरवर पसरली़ ते भुकेले असले तरी कधी कोणाला भाकरी मागितली नाही़ ते कधी एकेठिकाणी बसत नसत.
कीर्तनातून त्यांनी समाज परिवर्तनाला सुरुवात केली़ लोक ध्येयवेडे होऊन त्यांच्या कीर्तनात डुंबून जायचे़ शेतकºयांच्या शोषणावर त्यांनी कीर्तनातून जनजागृती केली़ रस्त्यावरचे दोन दगड घ्यायचे आणि त्याचाच ते टाळ करायचे़ क ीर्तनातून बाबा समाजाला सजग करायचे, दीनदुबळ्यांना शहाणे करवून सोडायचे़ एवढ्यावरच ते न थांबता अंधश्रद्धा, कर्मकांड, अघोरी प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला़ दारुबंदी, व्यसन मुक्तीसाठी ते झटले़ शिक्षणाचा प्रचार, प्रसार केला. उदात्त कार्यासाठी ते चंदनापरी झिजले़ दीनदुबळ्यांची सेवा हेच जीवनाचे व्रत होते़ वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत त्यांनी समाजाची सेवाच केली़ जानेवारी १९५६ मध्ये ते आजारी पडले़ त्यांना अमरावतीला हलविण्यात आले़ तिथेही त्यांना बरे वाटेना म्हणून नागरवाडीला आणले जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली अन् तो दिवस होता..२० डिसेंबऱ त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा मिळतोय़ आजची परिस्थिती पाहता म्हणावेसे वाटते़.. ‘गाडगे बाबा परत जन्माला या’!
- पुष्पा गायकवाड
(लेखिका या संत साहित्याच्या अभ्यासक आहेत)