Good News; कोविडवरील जागतिक स्पर्धेत सोलापूरच्या सोहमचा जगभरात झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 06:29 PM2020-08-18T18:29:28+5:302020-08-18T18:31:29+5:30
लघुपटाला दुसरा क्रमांक; ४० देशातील ४ हजार स्पर्धेकांना टाकले मागे
सोलापूर : सोलापूर येथील सोहम येमूल या ९ वर्षे वयाच्या मुलाने नुकत्याच लंडन येथे झालेल्या नेव्हर सच इनोसन्स (एनएसआय) संस्थेमार्फत घेतलेल्या कोविड -१९ रिस्पॉन्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन या स्पर्धेत ४० देशातील ४ हजार स्पर्धकांमधून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांनी बाहुल्यांचा वापर करून बनविलेल्या लघुपटाचे या स्पर्धेत कौतुक झाले. तेथील दामिनी विद्या मंदिर शाळेचा तो विद्यार्थी आहे.
एनएसआय या संस्थेने नुकतीच कोविड -१९ रिस्पॉन्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही स्पर्धा जागतिक स्तरावर आयोजित केली होती. आपल्या आई-वडिलांच्या मदतीने सोहमने एक लघुपट बनवून या स्पर्धेत भाग घेतला होता. या लघुपटात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बाहुला, तसेच कोरोना बाहुला व अन्य बाहुल्यांचा वापर केला होता.
गेल्या वर्षी सोहमने भारतातील सर्वात लहान वेंटरिओक्विस्ट आणि स्ट्रिंग पपेटर म्हणून विक्रम नोंदविला आहे. त्याच्या या स्पर्धेत दुसरा क्रमांक आल्याने व सर्वाच्या कौतुकास पात्र ठरला आहे.