सुखावह जगण्यासाठी सोलापूर देशात २२ वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:45 PM2018-08-14T15:45:58+5:302018-08-14T15:49:41+5:30
केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने सोमवारी देशातील अशा शहरांची यादी जाहीर.
सोलापूर : केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने सुखावह जगण्यासाठी देशातील १११ शहरांच्या केलेल्या सर्वेक्षणात सोलापूरने २२वे स्थान पटकावले आहे.
केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने सोमवारी देशातील अशा शहरांची यादी जाहीर केली. शहरे नागरिकांना राहण्यास किती चांगली आहेत याचे मूल्यमापन शहरांनाच करण्यास मदत व्हावी तसेच जागतिक व राष्ट्रीय निकषांत आपण कुठे आहोत हे त्यांना समजावे व शहरांनी व्यवस्थापन आणि नागरी नियोजनात निष्कर्षावर आधारित देशातील सर्व स्मार्ट सिटीसह १११ शहरांची पाहणी करण्यात आली होती.
या पाहणीत सुखावह जगण्याचे निकष हे प्रशासन, सामाजिक संस्था, आर्थिक आणि भौतिक पायाभूत सुविधेवर करण्यात आले. सोलापूरचा क्रमांक मागे जाण्यावर येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व नागरिकांना विरंगुळा म्हणून बागा व इतर ठिकाणांच्या अभावामुळे गुणांकन घटल्याचे दिसून आले आहे.
सोलापूरची लोकसंख्या साडेनऊ लाख गृहित धरून येथील १९ बाबींवर गुणांकन करण्यात आले. त्यामध्ये प्रशासन: २६, ओळख आणि संस्कृती: ५४, शिक्षण: ४१, आरोग्य: ५, सुरक्षितता: १०, आर्थिक व नोकरी सुबत्ता: ६८, घरे: ९३, सार्वजनिक मोकळ्या जागा: ४, मिश्र जागांचा वापर आणि मोकळेपणा: २, वीजपुरवठा: १८, वाहतूक व दळणवळण: १५, खात्रीशीर पाणीपुरवठा: ७२, घनकचरा व्यवस्थापन: ४०, वाढते प्रदूषण: ७३, संस्था: २६, सामाजिक: १८, आर्थिक: ६८, भौतिक: २०. पुण्याच्या तुलनेत सोलापूरला सुरक्षितता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व मोकळ्या जागांच्या सुविधामध्ये कमी गुण मिळाले आहेत. पण इतर शहरांच्या मानाने पाणी व आरोग्य सुविधा चांगल्या असल्याचे नमूद केले आहे.
सुखावह जगण्याच्या सुविधांमध्ये शहरांसाठी जी मानांकने ठरविण्यात आली त्यात सोलापूरचा सार्वजनिक मोकळ्या जागा व वाहतुकीचा विक पाँईट दिसत आहे. त्यामुळेच शहरात हिरवळ फुलविण्यासाठी बागांचा विकास कार्यक्रम हाती घेतला आहे.
- अविनाश ढाकणे, आयुक्त