Solapur: सोलापुरात ६८ लिंग पदयात्रा; चांगला पाऊस अन् सोलापूरच्या सुख, शांतीसाठी घातले साकडे
By Appasaheb.patil | Published: September 3, 2023 03:55 PM2023-09-03T15:55:49+5:302023-09-03T15:56:06+5:30
Solapur: तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून ६८ लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या ६८ लिंग पदयात्रा काढण्यात आली.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून ६८ लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या ६८ लिंग पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भक्तगणांनी हर्रर्र बोला हर्रर्र... चा जयघोष करीत पाऊस पडण्याबरोबरच सोलापूरच्या सुख, शांती आणि एकात्मतेसाठी साकडे घातले.
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती व पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. पदयात्रेचा समारोप दुपारी ३ वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती व पूजन करून करण्यात आली. विशेष करून या पदयात्रेत महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय होता. यावेळी बापूजी नगर येथील शांतवीर भजन मंडळाच्या सदस्यांनी ६८ लिंग व सिद्धेश्वरांवरील भजनगीते गायली.
पदयात्रेच्या मध्यंतरात मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालय येथे दीपकभाऊ निकाळजे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यावतीने तर पदयात्रेच्या समारोपाचे ठिकाणी श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे शांत वीर भजन मंडळाचे भजन गायक मल्लेश पेद्दी यांच्यावतीने फराळ व चहापान देण्यात आला.