Solapur: माळशिरसमध्ये ९६ हजार रेकॉर्ड तपासले, कुणबीचे १८५ पुरावे लागले हाती
By काशिनाथ वाघमारे | Updated: November 9, 2023 19:25 IST2023-11-09T19:23:49+5:302023-11-09T19:25:14+5:30
Solapur News : राज्यभर कुणबी पुरावा शोधमोहीम सुरू आहे. माळशिरस तालुक्यात महसूल विभागाने विशेष सहायता कक्ष स्थापन करून ८ नोव्हेंबरपर्यंत जुन्या जन्म, मृत्यू नोंदी, जुने सातबारे अशा प्रकारचे ९६ हजार रेकॉर्ड तपासण्यात आले

Solapur: माळशिरसमध्ये ९६ हजार रेकॉर्ड तपासले, कुणबीचे १८५ पुरावे लागले हाती
- काशिनाथ वाघमारे
सोलापूर - राज्यभर कुणबी पुरावा शोधमोहीम सुरू आहे. माळशिरस तालुक्यात महसूल विभागाने विशेष सहायता कक्ष स्थापन करून ८ नोव्हेंबरपर्यंत जुन्या जन्म, मृत्यू नोंदी, जुने सातबारे अशा प्रकारचे ९६ हजार रेकॉर्ड तपासण्यात आले असून, यामध्ये कुणबी उल्लेख असलेले मराठी व मोडी लिपीतील १८५ पुरावे मिळाले असून, १३ विभागामार्फत शोधमोहीम सक्रिय झाली आहे.
कुणबी उल्लेख असल्याचे विविध जुन्या कागदपत्रांची तपासणी सुरू असून, तालुकास्तरावर १९०० च्या आसपासचे दप्तर आढळत असून यामध्ये बहुतांश नोंदी मोडी लिपीत आहेत. त्यामुळे भाषेची अडचण भासत असून, या तपासणीसाठी मोडी लिपीचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तींना पाचारण करण्यात येत आहे. तालुक्यातील संगम, बाभुळगाव, वेळापूर या गावांतील जास्त नोंदी आढळल्या असून, इतरत्रही नोंदी आढळताना दिसत आहेत .गेल्या काही महिन्यांत या नोंदीच्या आधारे तीन दाखले लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत.
कुणबी उल्लेख असल्याची जुन्या कागदपत्रांची शोधमोहीम सुरू आहे. तरी याबाबतची नोंद असलेली जुनी कागदपत्रे कोणाकडे आढळल्यास संबंधितांनी दाखल्याबाबत अर्जासोबत तहसील कार्यालयाकडे द्यावीत.
-सुरेश शेजूळ, तहसीलदार, माळशिरस
महसूलच्या १३ विभागात तपासणी
खासरा पत्रक, पाहणी पत्रक, नागरिकाचे राष्ट्रीय रजिस्टर १९५१, नमुना नंबर १ व २ हक्क नोंद पत्र, सातबारा उतारा, गाव नमुना १४, खरेदी विक्री, जन्म मृत्यू नोंद, प्रवेश निर्गम नोंद वही अशा कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून, महसूलबरोबरच १३ विभागानुसार जुन्या शासन दरबारी असणाऱ्या जातीबद्दल उल्लेख गावस्तरीय कमिटी शाळा, ग्रामपंचायत तपासणी करणाऱ्या नोंदी यामध्ये तपासल्या जाणार आहेत .