आयशरला रिक्षा धडकल्यानं पाच प्रवासी; ट्रॅव्हल्सनं रिक्षाला कट मारल्याने दोघे गंभीर
By विलास जळकोटकर | Updated: June 24, 2024 17:44 IST2024-06-24T17:43:09+5:302024-06-24T17:44:22+5:30
जखमी शासकीय रुग्णालयात दाखल; लांबोटी अन् कोंडीजवळ दोन अपघात

आयशरला रिक्षा धडकल्यानं पाच प्रवासी; ट्रॅव्हल्सनं रिक्षाला कट मारल्याने दोघे गंभीर
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडी व लांबोटी येथे दोन अपघात झाले. यात लांबोटीजवळ थांबलेल्या आयशर टेम्पोवर रिक्षा धडकल्याने पाच प्रवासी जखमी झाले तर कोंडीजवळ पाठिमागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने रिक्षाला कट मारल्याने यातील दोघे असे सातजण जखमी झाले. दुपारी ही घटना घडली. जखमींना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मीरा दत्तात्रय सोनसळे (वय ५४), चैतन्य माधव सोनसळे (वय- १२), श्लोक मनोज सोनसळे, मधुरा मनोज सोनसळे (सर्व रा. मोहोळ), तानाजी पांडुरंग सुरवसे (वय ४५, रा. गुळवंची, ता. उत्तर सोलापूर) अशी लांबोटी येथील अपघातातील जखमींची नावे आहेत. कोंडीच्या अपघातात बसवेश्वर सुभाष म्हेत्रे (वय- ३१), रा. सलगर, ता. अक्कलकोट), सोमनाथ मल्लिनाथ सावरहोड (वय ४०, रा. सदाशिव पेठ, पुणे) हे जखमी झाले.
लांबोटीच्या अपघातातील जखमी प्रवासी सोलापूरहून मोहोळकडे रिक्षातून प्रवास करीत होते. लांबोटी येथे रस्त्यावर समोर थांबलेल्या आयशर टेम्पोला रिक्षानं पाठिमागून धडक दिल्याने पाचही प्रवासी जखमी झाले. त्यांना सर्वांगास मुका मार लागला. तोंडास व चेहऱ्यास जखम झाली. त्यांना सावळेश्वर टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेद्वारे येथील शासकीय रुग्णालयात डॉ. लखन राजमाने यांनी उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
कोंडीजवळ झालेल्या अपघातातील रिक्षा सोलापूरहून मोहोळच्या दिशेने निघाली होती. पाठिमागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने कट मारल्याने दोघांना डोक्यास जखम होऊन सर्वांगास मुका मार लागला. त्यांच्यावरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून, यातील एकावर उपचार करुन घरी पाठवण्यात आले.