Solapur: दमाणी नगरात चोरी करणाऱ्या कर्नाटकाच्या आरोपीला अटक, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त
By रूपेश हेळवे | Published: May 7, 2023 03:44 PM2023-05-07T15:44:25+5:302023-05-07T15:45:52+5:30
Solapur: महानगरपालिकेचा कर्मचारी असल्याचे भासवून दमाणी नगरातील अभिजीत सुरवसे यांच्या घरातील १४.५ तोळे सोने व रोख रक्कम चोरल्याप्रकरणी कर्नाटकातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
- रूपेश हेळवे
सोलापूर : महानगरपालिकेचा कर्मचारी असल्याचे भासवून दमाणी नगरातील अभिजीत सुरवसे यांच्या घरातील १४.५ तोळे सोने व रोख रक्कम चोरल्याप्रकरणी कर्नाटकातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा अशोका ( वय ३१, रा. तिर्थहळ्ळी, शिमोगा, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४ लाख ७५ हजारांचे दागिने व कार पोलिसांनी जप्त केली आहे.
मार्च महिन्यामध्ये आरोपींनी सुरवसे यांच्या घरात चोरी केली होती. त्याचा शोध घेताना गुन्हे शाखेच्या सपोनि दादासाहेब पथकाला आरोपी हे कर्नाटकातील असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. त्यातील आरोपी कृष्णा अशोका हा मंगळवेढाकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी अशोकाला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केला. दरम्यान, आरोपीकडून पोलिसांनी ९५ ग्रॅाम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असे एकूण ६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दादासो मोरे, संदीप जावळे, इम्रान जमादार, विनोद रजपूत, राजकुमार पवार यांनी केली.