एस-टी बसच्या संपाने सोलापूर आगाराला बसला चार कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:50 PM2017-10-23T15:50:29+5:302017-10-23T15:52:39+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कामगारांनी सातव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या चार दिवसांच्या संपामुळे महामंडळाला तब्बल चार कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले. ऐन दिवाळीत हा संप पुकारला गेला. पाचव्या दिवशी संप मिटल्यानंतर प्रवासी आणि एस. टी. प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. आणि यंत्रणा कामाला लागली. भाऊबीजेनिमित्त आणि दुसºया दिवशी २५० जादा गाड्या सोडून प्रवाशांना तत्पर सेवा देण्यात आली.
एस. टी. कामगार संघटनांकडून गेल्या काही महिन्यांपासून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी शासनाकडे विविध मार्गाने चर्चा, निवेदने देऊन वाटाघाटी करुनही सरकार दखल घेत नसल्याने संपाची नोटीस बजावून १७ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत उपोषण छेडले. राज्यभर धावणाºया एस. टी. महामंडळाच्या बस आगारांमध्ये थांबून राहिल्या. ऐन दिवाळीत पुकारलेल्या या संपामुळे ज्या हक्काच्या एस. टी. वर लाखो प्रवाशांची भिस्त होती तीच बंद झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. सरकारने हा संप मोडित काढावा प्रवाशांची सोय करण्यासाठी खास परिपत्रक काढून खासगी वाहनांद्वारे सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात खासगीवाल्यांनी संधीसमजून अव्वाच्या सव्वा भाडे आकारुन सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट केली.
गेली पन्नास वर्षांत ऐन दिवाळीत सलग चार दिवस बेमुदत संप होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या संपाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. शिवाय एस. टी. महामंडळाला दिवाळीत मिळणारे उत्पन्नही घटले गेले. सोलापूर विभागातील नऊ आगारांमध्ये दररोज सरासरी ८० लाखांचे उत्पन्न मिळते. दिवाळीसारख्या मोठ्या सणात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ती या कालावधीत एक कोटीच्या घरात जाते. यंदा चार दिवस संपामुळे बस बंद असल्याने सोलापूर विभागाचे सरासरी चार कोटी रुपये उत्पन्न बुडाले.
दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाने शासन आणि कामगारांना लोकहिताचा विचार करुन खडे बोल सुनावत मध्यस्थीचा तोडगा सुचवत त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. लागलीच यंत्रणा खडबडून जागी झाली आणि शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर युद्धपातळीवर सूचना केल्या गेल्याने शनिवारी सकाळपासून चार दिवस जागेवर थांबलेली एस. टी. सुरु झाली. भाऊबीजेचा दिवस असल्याने आणि एस. टी. बस सुरु झाल्याने परगावी जाणाºया प्रवाशांची सोय झाली. यानिमित्त सोलापूर विभागातून नियमित गाड्यांशिवाय शनिवारी १३० जादा गाड्या सोडल्या. परतीच्या प्रवासासाठी रविवारी १२० अशा २५० गाड्या सोडून प्रवाशांना तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न केल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी अश्वजीत जानराव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
------------------------
एस.टी. संप; रिक्षांसह हॉटेल, टपºयांवर परिणाम
च्चार दिवस एस. टी. महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम प्रवाशांसह रिक्षा, हॉटेल, टपºयांवरही झाल्याचे दिसून आले. दिवाळीच्या खरेदीसह परगावी जाणाºया प्रवाशांच्या गर्दीमुळे रिक्षा वाहतूक, हॉटेल, टपºयांसह छोट्या व्यावसायिकांचे चलन चालायचे. मात्र एस. टी. च बंद असल्याने प्रवाशांची संख्या रोडावली. याचा थेट परिणाम छोट्या व्यावसायिकांवरही झाला. दिवाळीत अन्य कालावधीपेक्षा चार पैसे जादा कमावण्याची संधी असते यंदा मात्र संपामुळे निर्बंध आल्याचे या व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
------------------------
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ सदैव कार्यरत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने यंदा दिवाळीत कामगारांच्या संपामुळे प्रवाशांना सेवा देता आली नाही. मात्र चार दिवसांच्या संपानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मार्ग निघताच शनिवारपासून तत्पर सेवा देण्यात आली. वेळापत्रकानुसार भाऊबीज आणि दुसºया दिवशी विशेष गाड्या सोडण्यात आल्या.
- अश्वजीत जानराव,
विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर विभाग