Solapur : ऊर्जा निर्मितीसोबतच एनटीपीसी आता ग्रामीण विकास साधणार, आजवर लावली पाच लाख झाडं
By रेवणसिद्ध जवळेकर | Published: March 21, 2023 04:45 PM2023-03-21T16:45:45+5:302023-03-21T16:45:58+5:30
Solapur:
- रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : ऊर्जा निर्मितीसोबतच आता एनटीपीसी पर्यावरण आणि आसपासच्या गावांची प्रगती साधण्यावर भर देणार आहे. सोलापूर एनटीपीसीमधील दोन युनिट यशस्वी करुन वीज निर्मितीत अव्वल स्थान निर्माण केल्यावर कंपनीने ही भूमिका जाहीर केली. येथील एनटीपीसी पर्यावरण संरक्षण आणि राखेच्या वापरासाठी अत्यंत जबाबदारीने काम करत आहे. जास्तीत जास्त झाडे लावून प्रकल्प परिसर आणि परिसर हिरवागार आणि स्वच्छ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
आजवर ४ लाख ९७ हजार झाडं लावण्यात आली असून, पैकी ५० हजार झाडे वर्षभरात लावण्यात आली आहेत. चालू आर्थिक वर्षात राखेचा सर्वोच्च महसूल आणि १०० टक्के सर्वोत्तम वापराचा टप्पा ओलांडला आहे. फताटेवाडी, होटगी स्टेशन, आहेरवाडी आणि तिल्हेहाळ या गावांमध्ये विकासही साधून एनटीपीसीने ग्रामस्थांना आपलेशे करुन घेतले आहे. पाण्याच्या टाक्या, रस्ते, शौचालयं, सोलर हाय मास्ट, बस निवारा, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, शाळा/पोलिस स्टेशनसाठी संरक्षक भिंती आदी कामांमुळे एनटीपीसी कंपनीने सामाजिक कार्यात आघाडी घेतली आहे. शेतकरी, महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, शेतकरी, प्रकल्पग्रस्त गावांमध्ये महिला बचत गटांसाठी गारमेंट युनिटची स्थापना आणि बरेच काही स्टेशनद्वारे पुरविले जात आहे. महिला बचत गटांसाठी मास्क शिलाई युनिट,गारमेंट युनिट आणि शिलाई मशीन साहित्याचा पुरवठाही केला आहे. गावांतील मुलींना बळकट करण्यासाठी बालिका सक्षमीकरण अभियान मोहीमही हाती घेण्यात आली आहे.