फटे गुंतवणूक घोटाळा: शेअर बाजारातील नफ्याच्या आमिषाला भुलून बार्शीकरांचे बुडाले कोट्यवधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 07:04 AM2022-01-16T07:04:58+5:302022-01-16T07:06:32+5:30
राजकीय नेते, उद्योजक, डॉक्टरांसह अनेकांची फसवणूक
- शहाजी फुरडे-पाटील
बार्शी (सोलापूर) : शेअर बाजारातील नफ्याचे गणित मांडून बार्शीकरांना कोट्यवधी रुपयांना फसविणाऱ्या विशाल फटेच्या गुंतवणूक घोटाळ्याची मोड्स ऑपरेंडी आहे काय, याचे अनेकांना कुतूहल आहे. बार्शीतील राजकीय नेते, उद्योजक, डॉक्टर्ससह अनेक उच्चभ्रू मंडळींची फसवणूक झाली आहे. ही रक्कम २०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर या घोटाळ्याची चर्चा सुरू झाल्यानंतर बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाचा ओघ सुरू झाला आहे. सुरुवातील केवळ ६ लोकांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. बुधवारी एका दिवसात आणखी ४० लोकांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.
६ तक्रारदारांची जवळपास ५ कोटी ६३ लाखांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी रात्रीपर्यंत तक्रारदार वाढल्याने हा आकडा जवळपास १२ कोटींवर गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामदास शेळके दिली. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
प्राध्यापकाचा मुलगा निघाला उद्योगी
विशाल फटे हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. त्याचे वडील बार्शीतील संस्थेत प्राध्यापक होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून तो बार्शीतच वास्तव्यास होता. बार्शीतच तो साई नेट कॅफे चालवत होता.
सुरुवातीला तो छोट्या प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक करत होता. २०१९ साली फिर्यादी दीपक आंबरे हे विशाल याच्या नेट कॅफेमध्ये पीक विम्याचा फॉर्म भरण्यासाठी गेले होते. तेथे त्यांची विशालसोबत ओळख झाली.
विशालने दीपकला शेअर बाजाराबद्दल सांगितले आणि त्यांच्याकडून पहिल्यांदा ७० हजार रुपये घेतले. पहिल्याच महिन्यात ३० हजार रुपये वाढ करून एक लाख रुपयांचा परतावा विशालने दीपकला दिला. यामुळे त्यांचा विश्वास वाढत गेला.
दीपक यांनी स्वत:सह आपल्या परिवारातील सदस्य, नातलगांचे पैसे, अशी ५ कोटी रुपयांची गुंतवणूक विशालकडे केली. बार्शीतील अनेकांनी विशालकडे पैसे गुंतवलेले होते.
नफा झाल्याची खोटी माहिती द्यायचा
ॲल्गो ट्रेडिंगच्या नावाखाली ॲटो ट्रेड करून मोठ्या प्रमाणात रिटर्न देतो, असे बोलायचा. त्याच्या विशालका या वेबसाइटचे एक ॲप त्याने तयार केले होते. तो त्यासंबंधित टिप्स ग्राहकांना द्यायचा, कृत्रिमरीत्या या ॲपवर ट्रेड केलेल्या एंट्री तयार करायचा व आज एवढा प्रॉफिट झाला, असे दाखवून त्यांना पैसेही देत होता. वास्तवात मात्र अशा प्रकारे तो कुठलेच ट्रेडिंग करीत नव्हता, हे आता स्पष्ट झाले आहे.
कोण आहे विशाल फटे?
गेल्या १० ते १५ वर्षांपासून आपण शेअर बाजारात ट्रेडिंग करत असल्याचे तो लोकांना सांगायचा.
अलका शेअर सर्व्हिसेसचे संस्थापक, विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेसचे संचालक, फोग्स ट्रेडिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, NSE, BSE चे सदस्य
असल्याची माहिती तो लोकांना सांगायचा.
मोडस ऑपरेंडी
२०१९ पासून बार्शीत त्याने अनेकांकडून गुंतवणूक करून घेतली. त्यातील काही जणांना २८ टक्के परतावा दिला.
nतीन महिन्यांत अनेकांनी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. २७ नोव्हेंबरला केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्याला एका वाहिनीचा पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. मात्र, ९ जानेवारीपासून त्याचा फोन बंद असून, बार्शीतून तो गायब झाला आहे.
९ जानेवारी रोजी विशाल आपल्या परिवारासह पसार झाला. यामुळे शहरभर चर्चा सुरू झाली. त्याच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण दलाची तीन ते चार पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.