सोलापूर बाजार समितीत रंगला सहकारमंत्री देशमुख विरुद्ध पालकमंत्री देशमुख सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:08 PM2018-06-20T13:08:39+5:302018-06-20T13:08:39+5:30
मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच महाआघाडी झाल्याचा दावा
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख विरुद्ध पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडी असा सामना रंगणार आहे. काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने यांच्या पुढाकाराने झालेल्या या महाआघाडीत राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अप्रत्यक्ष संमतीनेच सहकारमंत्र्यांविरोधात महाआघाडी झाल्याचा दावा आघाडीतील नेत्यांनी केला आहे.
सोलापूर बाजार समितीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. एकूण ३३० उमेदवारांपैकी २४९ उमेदवारांनी माघार घेतली. आता बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात ८१ उमेदवार आहेत.
च्सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला ‘श्री सिद्धरामेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल’ असे नाव देण्यात आले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी आमदार शिवशरण पाटील यांनी पॅनलमधील १५ उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे सादर करून चिन्हाची मागणी केली.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला ‘श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास आघाडी’ असे नाव देण्यात आले आहे. सुरेश हसापुरे यांनी १५ उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर केली. भाजपाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी मुस्ती गणातून तर सिद्धाराम चाकोते यांनी कुंभारी गणातून अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.
भाजपाचे दोन मंत्री आमने-सामने
राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय भाजपा सरकारने घेतला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, या ऐतिहासिक निवडणुकीत भाजपाचे दोन मंत्री आमने-सामने आले आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.