सोलापूर बाजार समिती निवडणूक मतदार यादीवर हरकती, एक हजाराहून अधिक शेतकरी मागताहेत मतदानाचा अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:00 PM2018-02-27T15:00:16+5:302018-02-27T15:00:16+5:30
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर सोमवारी हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ११८६ हरकती दाखल झाल्या. यातील बहुतांश हरकती या सामायिक खात्यावरील दुसºया आणि तिसºया क्रमांकाच्या शेतकºयांनी दाखल केल्या आहेत.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २७ : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर सोमवारी हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ११८६ हरकती दाखल झाल्या. यातील बहुतांश हरकती या सामायिक खात्यावरील दुसºया आणि तिसºया क्रमांकाच्या शेतकºयांनी दाखल केल्या आहेत.
सरकारने १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याची घोषणा केली होती. आमचे नाव ८ अ उताºयावर दुसºया क्रमांकावर असले म्हणून काय झाले. आम्हीसुद्धा शेतकरी आहोत. त्यामुळे आमच्या नावाचाही मतदार यादीत समावेश करावा, अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे.
सोलापूर बाजार समितीची प्रारुप मतदार यादी १६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. एकूण १५ गणांमध्ये ८० हजार ९२८ मतदारांचा समावेश आहे. हरकती नोंदविण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने १० दिवसांची मुदत दिली होती. सोमवार शेवटचा दिवस होता. शनिवारपर्यंत ४९६ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. सोमवारी एकाच दिवशी ७९० शेतकºयांच्या हरकती दाखल झाल्या. यातही उत्तर सोलापूर तालुक्यातून सर्वाधिक हरकती दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बहुतांश हरकती सामायिक खात्यावरील शेतकºयांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करावे, या मागणीसाठी केल्या आहेत. त्याचबरोबर नाव दुरुस्ती व इतर कारणांसाठीच्या हरकतींचाही समावेश आहे. यावर उद्यापासून सुनावणी होईल. ८ मार्चपर्यंत यावर निकाल देण्यात येणार आहे.
---------------------------
२१ हजार शेतकरी वंचित राहणार
- शासनाने बाजार समितीच्या निवडणुकीचा कायदा बदलताना १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देत असल्याचे जाहीर केले होते. प्रारुप मतदार यादी तयार करताना उताºयावरील किती शेतकºयांची नावे मतदार यादीत समाविष्ट करायची, असा प्रश्न निर्माण झाला. जिल्हा निवडणूक कार्यालयाने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले. निवडणूक प्राधिकरणाने मंत्रालयात मार्गदर्शन मागितल्यानंतर शासनाने ८ अ उताºयावर प्रथम क्रमांकांवर असलेल्या शेतकºयाचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उत्तर सोलापूर आणि तहसीलदारांनी मतदार यादी तयार केली. यात उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २१ हजार शेतकºयांची नावे वगळण्यात आली. यातील १ हजारांहून अधिक शेतकºयांनी आपल्या नावाचा मतदार यादीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. कायदा मोठा की परिपत्रक असा सवालही त्यांनी केला आहे.
------------------
१०६ मतदारांवर आक्षेप
- व्यापारी मतदारसंघातील १०६ मतदार थकबाकी असल्याने त्यांची नावे वगळावी, अशी मागणी एका शेतकºयाने केली आहे. यावरील निकालाकडेही लक्ष असेल.