सोलापूर बाजार समितीचे उमेदवार कार्यकर्त्यांनी ठरवावेत, सहकारमंत्री सुभाष देशुमख यांची सुचना, कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे केले आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 05:06 PM2018-02-03T17:06:14+5:302018-02-03T17:08:43+5:30
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाचीही उमेदवारी लादली जाणार नाही, कार्यकर्त्यांनीच उमेदवार ठरवावेत अशी सुचना सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३ : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाचीही उमेदवारी लादली जाणार नाही, कार्यकर्त्यांनीच उमेदवार ठरवावेत अशी सुचना सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली़
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती़ या बैठकीत बोलताना सहकारमंत्र्यांनी निवडणुक तयारीला लागा असे संकेत दिले़
सहकारमंत्री म्हणाले की, बाजार समितीची निवडणुकीत शेतकºयांच्या थेट मतदानाने होणार आहे़ बाजार समितीत शेतकºयांच्या हिताचे रक्षण करणाºया कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे परंतू उमेदवार लादण्याऐवजी जनतेतून ठरवला जावा असे मत त्यांनी मांडले़
गण आणि आरक्षण निहाय बैठका घेऊन संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या सुचना देताना इच्छुकांनी आपले स्वत:चे घोडे दामटण्यापेक्षा इतरांना संधी देणे अधिक संयुक्तिक ठरेल असा चिमटाही काढला़
प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतर कोणत्याही शेतकºयांचे नाव यादीतून वगळले जाणार नाही अथवा मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले़ कार्यकर्त्यांच्या सुचनावर चर्चा करण्यात आली़
या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, शिरीष पाटील, उपसभापती संदीप टेळे, पं़ स़ सदस्य प्रा़ एम़ डी़ कमळे, प्रशांत कडते, शशिकांत दुपारगुडे, डॉ़ चनगोंडा हविनाळे, सिध्दाराम हेले, हणमंत कुलकर्णी, राजू काकडे, मधुकर चिवरे, जि़प़सदस्य आण्णाप्पा बाराचारे, सुनिल कळके, महादेव पाटील, शामराव पाटील, सचिन पाटील, मळसिध्द मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, मंद्रुपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ, रावजी कापसे, मल्लेश्ी कस्तुरे, राधाकृष्ण पाटील, अल्लाउद्दीन शेख, संतोष बरूरे, अरूण गावडे, सुशीला ख्यायगोंडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते़
-------------
पॅनल भाजपाचे की सर्वसमावेक्षक ?
बाजार समितीच्या निवडणुकीत केवळ भाजपाचे पॅनल की अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देऊन सर्वसमावेशक पॅनल तयार करायचे याचीही चाचपणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बैठकीत केली़ चांगले कार्यकर्ते सोबत येणार असतील त्यांनाही संधी द्यायला हरकत नाही मात्र त्याचे सर्वाधिकार सहकारमंत्र्यांना द्यावेत असा सुर कार्यकर्त्यांनी आळवला़