लॉकडाऊनची अनावश्यक काल्पनिक भीतीने सोलापुरात कांद्याची आवक दुपटीने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:07 PM2020-11-27T16:07:25+5:302020-11-27T16:07:29+5:30
सोलापूर बाजार समिती; ११० ट्रक आवक, सरासरी ६ हजार रुपयांचा दर, दर मात्र घसरला
सोलापूर: लॉकडाऊनची अनावश्यक काल्पनिक भीती बाळगून मागील तीन दिवसांपासून सोलापूरबाजार समितीत कांद्याची आवक जवळपास दुपटीने वाढली आहे. त्यामुळे सरासरी दरही किंचीत घसरला आहे.गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ११० ट्रक आवक, सर्वाधिक सहा हजार दोनशे रुपये व सरासरी दोन हजार रुपये इतका दर मिळाला.
या अनावश्यक भीतीमुळे शेतीमाल विक्री करणे कठीण होणार आहे. यामुळे या सोमवारपासून सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक जवळपास दुप्पट झाली आहे. १७ नोव्हेंबर रोजी २४ ट्रक कांदा आवक झाला होता व सरासरी क्विंटलला दोन हजार सर्वाधिक ६ हजार १०० रुपये, १८ नोव्हेंबर रोजी ४४ ट्रक कांद्याची आवक झाली होती व सरासरी क्विंटलला २,१०० रुपये तर सर्वाधिक ६ हजार २०० रुपये, २० नोव्हेंबर रोजी ७० ट्रक कांदा आवक तर सरासरी २२०० रुपये व सर्वाधिक सहा हजार ५० रुपये, २४ नोव्हेंबर रोजी आलेल्या १३६ ट्रक कांद्याला क्विंटलला सर्वाधिक सहा हजार व सरासरी दोन हजार ६०० रुपये, २५ नोव्हेंबर रोजी १२० ट्रक कांदा आवक तर क्विंटलला
सरासरी दोन हजार ३००रुपये व सर्वाधिक पाच हजार, गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ११० ट्रक आवक, सर्वाधिक सहा हजार दोनशे रुपये व सरासरी दोन हजार रुपये इतका दर मिळाला.
आवक दुपटीने वाढली असली तरी सरासरी दरात फार घसरण झाली नसल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. सर्वाधिक दरात फार फरक दिसत नसला तरी मध्यम कांद्याचा दर कमी झाला आहे.
कांदा आवक वाढत राहील
अतिवृष्टीमुळे सुरुवातीच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र नंतरच्या कांद्याचे पीक राज्यातच चांगले आहे. सोलापूर बाजार समितीत महाराष्ट्रातील नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत, कर्नाटक व इतर राज्यातील कांद्याची आवक होत आहे. गुणवत्तेचा कांदा सोलापूर बाजार समितीत येत राहणार असल्याने कांदा आवक वाढतच राहील असे बाजार समितीतून सांगण्यात आले.