माण नदीवरील पुल अन् रस्ता दुरुस्तीसाठी रस्ता रोको
By दिपक दुपारगुडे | Published: June 1, 2024 07:25 PM2024-06-01T19:25:42+5:302024-06-01T19:26:33+5:30
ग्रामस्थांनी माण नदी पुलावरच रस्ता रोको आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना धारेवर धरले
सोलापूर : माण नदीवरील दोन्ही बाजूच्या रस्त्यांसह पुलाच्या कामासाठी दोन वेळा रस्ता रोको आंदोलन करूनही पूर्ण केले नाही. त्यामुळे संतप्त वाहनधारक, कडलास येथील ग्रामस्थांनी माण नदी पुलावरच रस्ता रोको आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान नदीवरील पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने सुमारे १ तास वाहतूक खोळंबली होती. अखेर राष्ट्रीय महामार्ग अभियंता अनिस खैरादी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन येत्या १५ दिवसांत रखडलेल्या रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिल्याने रस्ता रोको आंदोलन मागे घेतल्याचे पाणी संघर्ष समिती चळवळीचे नेते दत्तात्रय टापरे यांनी सांगितले.
शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कडलास येथील ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी सांगोला-जत महामार्गावरील माण नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन केले. सांगोला-जत महामार्गावरील माण व कोरडा नदीवरील पुलांची कामे व दोन्ही बाजूकडील रस्ता वगळता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होऊन सुमारे ४ ते ५ वर्षे उलटली. परंतु सदर पुलांच्या कामांसह दोन्ही बाजूच्या रस्त्याची कामे रखडल्यामुळे येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
आदोलनप्रसंगी सरपंच दिगंबर भजनावळे, शेतकरी सहकारी सूतगिरणीचे व्हा. चेअरमन ॲड. नितीन गव्हाणे, दत्ता टापरे, दत्ता जाधव, समाधान पवार, राहुल गायकवाड, संभाजी साळुंखे, संजय गायकवाड, पांडुरंग भजनावळे, अशोक ठोकळे, केशव गायकवाड, ताजू इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.