सोलापूरातील उद्योगांपुढे महागाईचे संकट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:55 AM2018-09-03T11:55:12+5:302018-09-03T12:00:35+5:30
रूपया घसरल्याचा परिणाम : सोलापुरातील वस्त्रोद्योग, कारखान्यातील आयात वस्तूंचे दर वाढले
रवींद्र देशमुख
सोलापूर : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपयाची दिवसेंदिवस घसरण होत असल्यामुळे सोलापुरातील मोठ्या उद्योगांनाही महागाईचे संकट झेलावे लागत असून, वस्त्रोद्योगासाठी लागणारे यार्न, फौंड्रीसाठी लागणारी सँड आणि अन्य कारखान्यांच्या आयात कराव्या लागणाºया कच्च्या मालाचे दर वाढले आहेत; मात्र प्रिसिजन कॅमशाफ्ट्स, बालाजी अमाईन्स या कंपन्या निर्यातही करत असल्यामुळे त्यांना सध्याच्या निर्यातीचा लाभही मिळत आहे.
टॉवेल आणि चादर निर्मितीसाठी देशात प्रसिध्द असलेला येथील वस्त्रोद्योग स्पर्धा आणि अन्य प्रश्नांमुळे अडचणीत आला असून, दोन - तीन वर्षांपूर्वी ५०० कोटींच्या घरात असलेली निर्यात आता निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे रूपयाच्या अवमूल्यनाचा वस्त्रोद्योगाला लाभ कमीच आहे. सोलापुरातील निर्यातदार यंत्रमागधारक धाग्यामध्ये पॉलिस्टर यार्न आणि कलर यार्नचा वापर करतात. हा वापर एकूण यार्न वापराच्या २० टक्के इतका कमी असला तरी तो आयातच करावा लागतो. रूपया घसरल्यामुळे दोन्ही यार्नचा दर किलोमागे १० ते १५ रूपयांनी वाढलेला आहे, अशी माहिती यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी दिली.
लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे म्हणाले की, रूपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे पंप्स आणि इलेक्ट्रिक मोटारीचे दर भविष्यात वाढणार आहेत. पेट्रोलियम पदार्थ विशेषत: इंधनाचे दर वाढल्यामुळे आजच वाहतूकदारांनी आम्हाला दर वाढवून देण्याची मागणी केली आहे. लक्ष्मी हायड्रॉलिक्सच्या उत्पादनामध्ये कॉपर वायरचा ४० टक्के वापर केला जातो. ही वायर आम्हाला आयातच करावी लागते. रूपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे कॉपर वायर आता प्रती टन ५ लाख रूपयांनी महागली आहे. कंपनीकडून निर्यात कमी असल्यामुळे अवमूल्यनाचा फारसा लाभ होत नाही, असेही ते म्हणाले.
विविध आजारांवरील औषधे आणि अन्य कारणांसाठी लागणारे अमाईन्सचे उत्पादन करण्यात आघाडीवर असलेल्या बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी म्हणाले की, आम्हाला कच्च्या मालाची वर्षाला २०० ते २५० कोटी रूपयांची आयात करावी लागते. रूपया घसरल्यामुळे अमाईन्स बनविण्यासाठी लागणाºया सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. आयातीच्या तुलनेत ‘बालाजी’ची निर्यात केवळ १५० कोटी रूपयांची आहे. रूपयाच्या घसरणीचा विचार करता आम्ही निर्यात वाढविण्यासाठी योजना आखल्याचेही ते म्हणाले.
प्रिसिजन कॅमशाफ्ट्स ही सर्वप्रकारच्या चारचाकी आणि बहुचाकी वाहनांना लागणाºया कॅमशाफ्ट्सची निर्मिती करण्यात जगातील तिसºया क्रमांकाची कंपनी आहे.
‘प्रिसिजन’चे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे म्हणाले की, प्रिसिजन एकूण उत्पादनाच्या ८५ टक्के म्हणजेच ४५० कोटी रूपयांची निर्यात करते. सध्याच्या रूपया घसरणीच्या काळात जी निर्यात होते, त्याचा लाभ कंपनीला नक्कीच होत आहे; पण या काळात मशिनरीची आयात करावी लागते. आवश्यकतेनुसार ती आजही परदेशातून खरेदी केली जाते. हे दर मात्र वाढलेले आहेत. शिवाय फौंड्रीसाठी वापरण्यात येणाºया सँडमध्ये पेट्रोकेमिकल्सचा वापर असतो. रूपया घसरल्यामुळे ही सँड किलोमागे ५० पैशांनी महाग झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
निर्यात वाढविणारे धोरण हवे!
रूपयाच्या अवमूल्यनामुळे उद्योग क्षेत्रासाठी लागणाºया कच्च्या मालाच्या दरात भरमसाठ वाढ झाली. शिवाय इंधनाचे दरही वाढलेले आहेत. सरकारने निर्यात वाढविणारे धोरण आखणे गरजेचे असून, शहरात मिळणाºया पेट्रोलवर लावण्यात आलेला ९ रूपयांचा अधिभार राज्य सरकारने कमी केला पाहिजे. याशिवाय वस्तू आणि सेवा करामध्ये सरकारला १ लाख १५ हजार कोटी रूपयांचा लाभ झाला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे २६ टक्के व २४ टक्के असणारा मूल्यवर्धित कर कमी करावा, अशी मागणी सोलापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी केली आहे.
अवमूल्यनाचे परिणाम
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपयाची दररोज घसरण सुरू असून, सप्टेंबरअखेरपर्यंत एका डॉलरचा दर ७२ रूपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीला ६८.४६ रूपये असलेला डॉलरचा दर आता ७१ रूपयांपर्यंत आला आहे. याचे सोलापूरच्या उद्योग क्षेत्राला लागणाºया वस्तूंचे दर असे वाढलेले आहेत.