वस्तूंचा नवा ट्रेंड जाणून घेण्यासाठी सोलापूरचे व्यावसायिक मुंबई, सूरत, हैदराबादच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:03 AM2019-09-16T11:03:45+5:302019-09-16T11:06:08+5:30

पक्ष पंधरवड्यामुळे ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत व्यापार घटतोय; पंधरा दिवसांत दसरा, दिवाळीची तयारी

Solapur businessmen visit Mumbai, Surat, Hyderabad to learn about the latest trends in goods | वस्तूंचा नवा ट्रेंड जाणून घेण्यासाठी सोलापूरचे व्यावसायिक मुंबई, सूरत, हैदराबादच्या भेटीला

वस्तूंचा नवा ट्रेंड जाणून घेण्यासाठी सोलापूरचे व्यावसायिक मुंबई, सूरत, हैदराबादच्या भेटीला

Next
ठळक मुद्देपक्षपंधरवड्यामध्ये ग्राहक हे खूप गरज असेल तरच खरेदी करतातटीव्ही, मोबाईल, फ्रीज यासारख्या वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण कमीदसरा-दिवाळीसाठी देण्यात येणाºया योजनांचे नियोजन, जाहिराती देणे, वस्तू उपलब्ध करणे आदी कामे केली जात

सोलापूर : पितृपंधरवड्यास १४ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला असून, त्याचा येथील व्यापारावर परिणाम होणे सुरू झाले आहे. २८ सप्टेंबरपर्यंतच्या या पंधरवड्यात सराफी, अ‍ॅटोमोबाईल्स, होम अप्लायन्सेस आणि कपड्यांच्या व्यापारात ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत  घट होईल, असा दावा येथील व्यापाºयांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला. व्यवसाय कमी होत असला तरी आम्ही आगामी दसरा -  दिवाळी या  मोठ्या सणांची तयारी करीत आहोत. वस्तूंचा नवा ट्रेंड जाणून घेण्यासाठी मुंबई, हैदराबाद,  सूरत, दिल्ली, कोलकाताचा दौरा करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

दसरा, दिवाळीसारखे मोठे उत्सव पाठोपाठ येतात. या उत्सवात बाजारपेठेत आनंदाचे वातावरण असल्याने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले लोकच नाही तर इतर लोकही बाजारपेठेकडे खरेदी करण्यासाठी येतात. 

या काळातला व्यवसाय हा वर्षातील सर्वात जास्त नफा  मिळवून देणारा असतो. यासाठी चांगले नियोजन करावे लागते. हे नियोजन या पक्षपंधरवड्यात केले जाते. ग्राहकांचा कमी प्रतिसाद असल्यामुळे व्यापाºयांना वेळ मिळतो. म्हणून या काळात मुंबई, दिल्ली, हैदराबाद, सूरत आदी शहरांतील बाजारपेठेत कोणता  ट्रेंड आहे, हे पाहण्यासाठी त्या शहरांकडे व्यापारी जातात. त्यानंतरच पुढे काय करायचे हे ठरविले जाते. मात्र, आपल्या दुकानात येणारे वीज बिल, दुकानाचे भाडे, कर्मचाºयांचे वेतन हे त्यांना द्यावेच लागतात़

आपल्या घराकडे लक्ष देण्याची हीच वेळ
- व्यवसायाच्या व्यापामुळे व्यापाºयांना आपल्या घराकडे लक्ष देता येत नाही. पक्षपंधरवड्यामध्ये ग्राहक हे खूप गरज असेल तरच खरेदी करतात. त्यामुळे दुकानामध्ये काम कमी असते. याच काळात घर व दुकान रंगवून घेणे, डागडुजी करणे यासह इतर कामे केली जातात. हे १५ दिवसच आपल्या घराकडे लक्ष देण्यासाठी वेळ असल्याचे कपड्याचे व्यापारी प्रकाश आहुजा यांनी सांगितले. यासोबतच दसरा-दिवाळी या सणासाठी कपडे आणणे, त्यांना लेबल लावणे, सवलती कोणत्या द्यायच्या हे ठरविले जाते.

वॉशिंग मशीनला मागणी
- या काळात इलेक्ट्रॉनिक्समधील व्यवसाय कमी असतो. टीव्ही, मोबाईल, फ्रीज यासारख्या वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण कमी असताना, वॉशिंग मशीनच्या खरेदीसाठी गर्दी होते. दसरा व दिवाळी सुरु होण्याच्या आधी बहुतांश घरांमध्ये सर्व प्रक ारचे कपडे धुतले जातात. या काळात घर व घरातील वस्तू जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याकडे कल असतो. यामुळे वॉशिंग मशीनला मागणी जास्त असते. या काळात दसरा-दिवाळीसाठी देण्यात येणाºया योजनांचे नियोजन, जाहिराती देणे, वस्तू उपलब्ध करणे आदी कामे केली जात असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे व्यापारी शंतनु बदामीकर यांनी सांगितले.

पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. या काळात कोणतेही चांगले काम करायचे नाही असा समज पसरला आहे. या काळाला अशुभ समजले जाते, पण हा काळ अशुभ नसून तो पितरांच्या स्मरणासाठी राखीव असतो. या काळात आवश्यकतेनुसार वस्तूंची खरेदी, जागा खरेदी, लग्नसमारंभ केले तरी चालू शकतात. या गोष्टी करु नयेत असे कुठेही सांगितले नसल्याने नेहमीप्रमाणे आपले व्यवहार करता येतात.              
- मोहन दाते, पंचांगकर्ते 

सराफा व्यापार २० ते २५ टक्केच व्यवसाय
- इतर व्यवसायांप्रमाणे सराफा व्यवसायातही पक्षपंधरवड्यात मरगळ आलेली असते. नेहमीच्या तुलनेने व्यवसायात २० ते २५ टक्के इतकाच व्यवसाय होतो. मात्र, या काळात सराफ व्यावसायिक दुकान स्वच्छ करणे, अकाउंट तपासणे, फाईल अपडेट करणे आदी कामे करत असतात. यासोबतच येणाºया दसरा व दिवाळी या मोठ्या सणांसाठी तयारी केली जाते. दुकानात काय हवे हे तपासून त्याप्रमाणे खरेदी केली जात आहे़
- गिरीश देवरमनी
सराफ व्यावसायिक, सोलापूर

दुकान सजविणे, मेळाव्याकडे आॅटोमोबाईल क्षेत्राचा कल
- पक्षपंधरवड्याच्या काळात व्यवसाय हा ५० टक्के इतकाच असतो. या काळात स्वस्थ न बसता येणाºया उत्सवासाठीची तयारी केली जाते. दुकान सजविण्यापासून ग्राहकांसाठी मेळावे घेणे असे उपक्रम घेतले जातात. पहिल्यांदा वाहन घेणारे, एखादे वाहन असताना दुसरे वाहन घेणारे तसेच आपल्याकडील जुने वाहन देऊन नवीन वाहनांची खरेदी करणारे अशा तीन प्रकारच्या ग्राहकांसाठी विविध योजनांचे नियोजन या दरम्यानच्या काळात केले जाते. 

वाहन कर्ज देणारे बँक, फायनान्स कंपन्यांसोबत बैठकाही घेतल्या जातात. जे लोक वाहन खरेदीसाठीची माहिती घेऊन गेले त्यांचा पाठपुरावा करणे, जाहिराती करणे, योजना आखणे, मनुष्यबळ उभे करणे, ग्राहकांच्या मागणीनुसार वाहनांचे रंग व प्रकार उपलब्ध करुन देणे आदी कामे या १५ पंधरा दिवसांत केले जात आहे़
- शिवप्रकाश उर्फ बाबू चव्हाण
आॅटोमोबाईल क्षेत्रातील व्यापारी, सोलापूर

Web Title: Solapur businessmen visit Mumbai, Surat, Hyderabad to learn about the latest trends in goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.