Solapur: उपचारात निष्काळजीपणा दाखवल्यानं मुलाचा मृत्यू; आईची तक्रार, डॉक्टरवर गुन्हा
By रवींद्र देशमुख | Published: May 16, 2024 05:49 PM2024-05-16T17:49:08+5:302024-05-16T17:49:24+5:30
Solapur: पूर्वपरवानगीशिवाय मुलाला इंजेक्शन दिल्यानं आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आईनं दिलेल्या तक्रारीवरुन डॉक्टराविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात भा. दं. ३०४ अन्वये बुधवारी गुन्हा नोंदला आहे.
- रवींद्र देशमुख
सोलापूर - पूर्वपरवानगीशिवाय मुलाला इंजेक्शन दिल्यानं आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आईनं दिलेल्या तक्रारीवरुन डॉक्टराविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात भा. दं. ३०४ अन्वये बुधवारी गुन्हा नोंदला आहे. ही घटना २३ ऑगस्ट २०२२ रोजी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी रहिमतबी हुसेनसाब केन्नीवाले (वय- ५०, रा. आळंद, जि. गुलबर्गा) यांनी फिर्याद दिली असून, जिलानी हुसेनसाब केन्नीवाले (वय- १७) असे मयत मुलाचे नाव आहे. डॉ. नवीन सुभाष तोतला (मल्टी स्पेशॉलिटी हॉस्पिटल, सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या डॉक्टरांचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीचा मुलगा जिलाने याने दोन वर्षापूर्वी ॲसिड प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी सोलापुरातील अग्रवाल नर्सिंग होम येथे दाखल केले होते. या हॉस्पिटलमधील डॉ. नवीन तोतला त्याच्या उपचारासाठी पाहणी करीत होते. उपचारानंतर मुलाची तब्येत सुधारल्याने अग्रवाल नर्सिंग होम येथून डिस्चार्ज देण्यात आला.
त्यानंतर १५ दिवसांनी २३ ऑगस्ट रोजी फिर्यादी मुलाला चेकअसाठी डॉ. अग्रवाल नर्सिग होममध्ये आले. डॉ. अग्रवाल यांनी डॉ. तोतला यांनी मुलावर उपचार केल्याने त्यांच्याकडे जाण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी मुलाला तोतला मल्टीस्पेशॉलिटी येथे घेऊन गेले. डॉ. तोतला यांना फिर्यादीकडून मुलाला खालेले पचत नाही, उलटी होते अस सांगितल्याने त्यांनी मुलाला इंजेक्शन दिले. इंजेक्शन देतेवेळी जिलानी शुद्धीवरच होता असे फिर्यादीचे म्हणणे आहे.
इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरांनी जिलानीच्या तोंडात नळी घातली. त्यावेळी जिलानीला त्रास होऊ लागल्याने जिलानीला आणखी एक इंजेक्शन दिले. यानंतर तो बेशुद्ध पडला. यानंतर डॉक्टरांनी जिलानीच्या तोंडातील नळी काढून रुग्णवाहिकेतून आधार हॉस्पिटल येथे पाठवून दिले. आधार हॉस्पिटल येथे दाखल होताच उपचारापूर्वीच जिलानी मृत झाल्याचे आधार हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी जाहीर केले. सदर बझार पोलिसांनी नमूद डॉक्टराविरुद्ध भा. दं. वि. कलम ३०४ अन्वये गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास महिला फौजदार व्हट्टे करीत आहेत.
निष्काळजीपणामुळे मृत्यू
यातील आरोपी डॉक्टर नवीन तोतला यांनी फिर्यादीच्या परवानगीशिवाय दिलेल्या इंजेक्शनमुळे त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी निष्काळजीपणा दाखवल्याने आमचा मुलगा दगावला. त्यामुळे त्याच्या मृत्यूस डॉक्टर तोतला हेच जबाबदार आहेत .अशी फिर्याद मृत जिलानीच्या आईने सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.