Solapur: सोलापुरातील कामगारांच्या मुलांनी हजारो पक्ष्यांसाठी बनवली पाणपोई; टाकाऊपासून टिकाऊचा अवलंब
By Appasaheb.patil | Published: February 28, 2023 01:51 PM2023-02-28T13:51:38+5:302023-02-28T13:52:06+5:30
Solapur: देवराज प्राथमिक शाळा पक्ष्यांच्या पाणपोईसाठी सरसावली असून येथील शिकणाऱ्या कामगारांच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ या पद्धतीचा अवलंब करत पक्ष्यांसाठी पाणपोई उभारली आहे.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत.सोलापुरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. असत मुक्या प्राणी-पक्ष्यांचे हाल सुरू झाले असून पाण्यावाचून त्यांची तडफड होऊ नये,यासाठी हद्दवाढ भागातील देवराज प्राथमिक शाळा पक्ष्यांच्या पाणपोईसाठी सरसावली असून येथील शिकणाऱ्या कामगारांच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ या पद्धतीचा अवलंब करत पक्ष्यांसाठी पाणपोई उभारली आहे.
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले या उक्तीप्रमाणे देवराज प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत पक्ष्यांसाठी पाणवठा तयार केले आहे.प्लास्टिकच्या बाटल्या,डाबण,सुतळी,विटा आदी साहित्यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी शाळेतील खिडक्यांमध्ये,झाडांमध्ये व सुरक्षित ठिकाणी या पक्ष्यांसाठी पाणवठे निर्माण केले आहेत. यामुळे या ठिकाणी पक्ष्यांची गर्दी होताना दिसत आहे.पशु-पक्षी हे राष्ट्राचे संपत्ती आहेत आणि त्यांचे जतन होणे ही काळाची गरज असून त्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवल्याचे मुख्याध्यापिका आशाराणी डोके यांनी सांगितले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वनाथ बिराजदार,प्रफुल्लकुमार पाटील, शंभुलिंग अकतनाळ,स्वाती म्याकल,विनोद माशाळे,महेश कुंभार,जयंत गायकवाड, मळसिद्ध केवटे, निश्चलदास म्हेत्रे, पद्मसिंह व्हरडे, प्रसाद साळुंखे, शशिकला सातपुते, वंदना लचमापुरे, मल्लिनाथ अचलेरकर प्रशांत यादव, चंद्रकला कांबळे, निता कटारे, गंगुबाई कुलकर्णी यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या माणुसकीच्या उपक्रमाचे संस्थापक नागनाथ सुरवसे, उपाध्यक्ष डॉ.श्रीपाद सुरवसे, सचिव संजीवनी पडवळकर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका माने, सागर सुरवसे, चैताली जुगदार आदींनी कौतुक केले आहे
चिमुकले मुक्या पक्ष्यांसाठी दररोज साठवतात पाणी..
या शाळेत शिकणारी बहुतांश मुले ही कामगार वर्गातील आहेत. त्यांना पाण्याचे महत्व अनमोल असल्याचे कळते म्हणूनच मुक्या पक्ष्यांसाठी दररोज शाळा सुटल्यानंतर वॉटरबॅग मधील उरलेले पाणी या पाणवठ्यात साठवण्यासाठी चिमुकले धडपडत असताना या ठिकाणी दिसत आहेत.