तलावातील विसर्जन रोखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 02:35 PM2020-08-29T14:35:13+5:302020-08-29T14:37:40+5:30
छुपे रस्तेही केले बंद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी अर्थात शहरातील तलावामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई असून, ती डावलून काही सोलापूरकर भक्त तेथे ‘श्री’ मूर्तींचे विसर्जन करीत आहे. त्यामुळे विसर्जन रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शिवाय प्रशासनाने धर्मवीर संभाजी तलावाकडे जाणारे छुपे रस्ते बंद केले आहेत.
विसर्जनाला गर्दी झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. यामुळे प्रशासनातर्फे यंदाच्या वर्षी तलावामध्ये श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई केली आहे. मनाई केल्याचा फलक तलाव परिसरात लावण्यात आला आहे. तरी देखील अनेक लोक या फलकाकडे दुर्लक्ष करत तलावात मूर्तीचे विसर्जन करत असल्याचे दिसून आले. धर्मवीर संभाजी तलावाकडे जाण्यासाठी तलावाच्या डावीकडे असणाºया छुप्या रस्त्यांचा वापर करण्यात येत होता. हा रस्ता आता महापालिकेतर्फे बंद करण्यात आला आहे. - तलाव परिसरात नेहमीपेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आल्याचे शुक्रवारी दिसून आले.