सोलापूर शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:35 PM2018-06-22T14:35:37+5:302018-06-22T14:35:37+5:30
चोरट्यांचे पोलिसांना आव्हान, गस्त वाढविण्याची मागणी
सोलापूर : शहरात मागील दोन दिवसांपासून कुलूपबंद घरांवर नजर ठेवून हात साफ करणाºया चोरांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. बुधवारी वसंत विहारमध्ये झालेली घरफोडी ताजी असताना पुन्हा दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करुन १ लाख ३२ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या दोन्ही चोरीच्या घटना २० जून रोजी आर्केड सेकंड प्लोअर गांधी नगर व ए १ कॉम्प्लेक्स येथे झाल्या.
साबेरा नूरमहमद मुजावर (रा. ए १ कॉम्प्लेक्स जोडभावी पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. साबेरा या वळसंग येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
अज्ञात चोरट्याने बनावट चावीने फिर्यादीच्या घराचे कुलूप उघडून आत प्रवेश करून कपाटातील सोन्याची बोरमाळ, नेकलेस , कानातील झुमके, मंगळसूत्र , रिंग जोड , अंगठी, पैंजण असा एकूण १ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. तसेच चोरट्याने त्याच कॉम्प्लेक्समधील हरिदास बाबुराव जोगदनकर यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला; मात्र त्यांच्या घरातून चोरट्याने काही नेले नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मात्रे करत आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी
भगवान मच्छिंद्र कदम (वय ३५,रा. गांधीनगर, अक्कलकोट रोड) यांचे घर फोडून चोरट्याने सात रुपयांचा करंडा व कडा तोडून चोरुन नेला. चोरट्याने बनावट चावीने कदम यांच्या घराचा दरवाजा उघडून कपाटातील चांदीचा करंडा व कडा चोरुन नेला. कदम यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बनावट चावीचा वापर
चोरट्यांनी आतापर्यंत येथे हातसफाई केली त्या ठिकाणी घराचा दरवाजा उघडण्यासाठी बनावट चावीचा वापर केल्याचे दिसून आले आहे. घरावर पाळत ठेवून चोरटे डाव साधत आहेत.