सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वरांचे नाव देण्याची मागणी, मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 01:26 PM2017-11-13T13:26:47+5:302017-11-13T15:39:02+5:30
सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय शिवा वीरशैव संघटना व सिद्धेश्वर भक्तांच्यावतीने सोमवारी (13 नोव्हेंबर) सोलापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय शिवा वीरशैव संघटना व सिद्धेश्वर भक्तांच्यावतीने सोमवारी (13 नोव्हेंबर) सोलापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र होते. त्यानंतर मात्र बंदला हिंसक वळण लागले.
सोलापूर विद्यापीठाला सिद्धरामेश्वरांचे नाव देण्यासाठी शिवा संघटना व सिद्धेश्वर भक्तांनी पुकारलेल्या शहर बंदला हिंसक वळण लागले. रेल्वे लाईन परिसरात रिक्षा जाळली. तसेच दादाश्री गणपती जवळ हुल्लडबाजी करणार्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहर बंदमध्ये व्यापार्यांच्या विविध संघटना, सामाजिक संस्था व संघटना सहभागी झाल्या आहे.
बंदला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जवळपास सर्वच व्यापार्यांनी पाठिंबा दिल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळपासूनच बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद होते. शहरातील नवी पेठ, सराफ गल्ली तसेच इतर ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी दुकाने सुरू आहेत त्यांनाही या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. पोलिसांनी घोषणा देणार्या काही जणांना ताब्यात घेतले आहे. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील विविध भागात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्य बाजारपेठ, नवी पेठ तसेच इतर ठिकाणी पेट्रोलिंगही करण्यात येत आहे.