हद्दवाढच्या ३०० कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ मिळणार; आयुक्तांनी काढले आदेश
By Appasaheb.patil | Published: January 15, 2023 03:31 PM2023-01-15T15:31:48+5:302023-01-15T15:32:06+5:30
हद्दवाढच्या ३०० कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ मिळणार असल्याचे आदेश सोलापुर आयुक्तांनी काढले.
सोलापूर : सोलापूर हद्दवाढीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या लगतच्या ११ ग्रामपंचायतींकडील महापालिका सेवेत नियमित केलेल्या हद्दवाढीकडील ३०० कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभ देण्याबाबत शासनाचे मार्गदर्शन प्राप्त झाले. त्यानंतर महापालिका आयुक्त शीतल तेली - उगले यांनी ४ अटींची पूर्तता करून संबंधित कर्मचाऱ्यांना लाभ देण्याचे कार्यालयीन आदेश काढले आहेत.
सोलापूर हद्दवाढीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या लगतच्या ११ ग्रामपंचायतींकडील महापालिका सेवेत नियमित केलेल्या कर्मचाऱ्यांना याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांचे सेवाविषयक लाभ व सेवा निवृत्तीचे लाभ देता येतील. तसेच त्यांच्या मागील थकबाकीच्या रकमांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही करता येईल, असे मार्गदर्शन पत्राद्वारे नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना कळविले आहे. त्यानंतर तातडीने महापालिका आयुक्तांनी कार्यवाही केली आणि आदेश काढले.
महापालिकेने पाठविलेल्या पत्रावर नऊ महिन्यांनंतर नगरविकास विभागाने हे मार्गदर्शन पाठविले आहे. संबंधित ३०० कर्मचाऱ्यांना याचा आता लाभ होणार आहे. यासाठी ‘धर्मवीर शहर हद्दवाढ कर्मचारी सोलापूर महापालिका संघटने’च्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला हाेता. याबद्दल या ‘धर्मवीर’ संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हुणजे यांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत. दरम्यान, या कर्मचाऱ्यांनी महापालिका आवारात एकत्र येऊन आनंद व्यक्त केला. संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हुणजे यांचा सत्कार करण्यात आला.