दगाबाज बाप, बेवफा माँ, और पेट में का बच्चा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:35 PM2019-04-08T12:35:19+5:302019-04-08T12:37:35+5:30
पोलिसांनी त्याच्या मोबाईलवरुन तिला गेलेले कॉल याची माहिती काढली. पोलिसांना माहितीचा खजिनाच मिळाला.
त्या दिवशी ते गृहस्थ आॅफिसला आले होेते. त्यांच्या विवाहित मुलीचा प्रियकराने खून केलेला होता. आरोपीला शिक्षा होण्यासाठी ते वकीलपत्र देण्यासाठी आले होते.
त्यांची मुलगी देखणी, पण चंचल मनाची होती. लग्नानंतर तिला एक मुलगा झाला. तिचा पाय घसरला. परपुरुषाशी विवाहबाह्य लफडे सुरू झाले. एकेदिवशी नवºयाने तिला प्रियकरासोबत नको त्यावेळी ‘रंगेहाथ’ पकडले. तिला घरातून हाकलून दिले. दोन वर्षांच्या मुलाला घेऊन ती माहेरला आली. नवरा करणी धरणीसाठी त्रास देतो. त्यासाठी मारहाण करून नवºयाने हाकलून दिले, असे आई-वडिलांना तिने सांगितले. आई-वडील जावयाला जाब विचारायला गेले आणि शरमेने त्यांची मान खाली गेली. त्यांना खाली मुंडी घालून परत यावे लागले. कारण जावयाने तिच्या प्रेमप्रकरणाचे सारे पुरावेच तिच्या वडिलांकडे दिले होते.
माहेरी वडिलांकडे राहात असतानादेखील तिचे उद्योग चालूच होते. ‘चालूच’ होती ती. वडिलांनी जाब विचारला तर वडिलांशीच भांडत होती. गरीब आई- वडील नाईलाजाने तिला सर्व गुणदोषासह सहन करीत होते.
काही दिवसानंतर तिचा संशयास्पद मृत्यू झाला. प्रकरण पोलिसांकडे गेले. तिच्या प्रेताचा पंचनामा करताना तिच्या हातावर एका पुरुषाचे नाव गोंदलेले आढळले. पंचनामा झाल्यानंतर पोस्टमार्टेमसाठी प्रेत सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले. पोस्टमार्टेममध्ये ती गरोदर आढळली. डॉक्टरांनी तिच्या रक्ताचा नमुना, पोटात मृतावस्थेत असलेल्या अर्भकाच्या रक्ताचा नमुना घेतला. पोलिसांनी तिच्या नवºयावर संशय घेतला. नवºयानेच तिचा चारित्र्याचा संशयावरुन खून केला असा निष्कर्ष काढून त्याला ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान तो घटनेच्यावेळी त्याच्या घरात असल्याचे मोबाईल लोकेशनवरुन आढळून आले. घटनास्थळापासून त्याचे राहते घर सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर होते. पोलिसांना खात्री पटली की, नवरा निष्पाप आहे. त्यांनी नवºयाला सोडून दिले. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात गुप्तपणे तपास चालू केला. तिच्या हातावर गोंदलेल्या नावाच्या व्यक्तीबद्दल चौकशी चालू केली. पोलीस तपासात लगेचच ज्या व्यक्तीबरोबर तिचे प्रेमप्रकरण होते, त्याच्याविषयी माहिती मिळाली. त्याला पोलीस स्टेशनला बोलावले. सुरुवातीला त्याने सर्व नाकारले. ती बाईच माझ्या ओळखीची नव्हती असे तो सांगू लागला.
पोलिसांनी त्याच्या मोबाईलवरुन तिला गेलेले कॉल याची माहिती काढली. पोलिसांना माहितीचा खजिनाच मिळाला. अनेकवेळा दोघात कॉल झाले होते. प्रेमाचे मेसेज झाले होते. पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. तिने लग्नाबद्दल तगादा लावला होता. त्यामुळेच मी तिला मारुन टाकले, अशी कबुली दिली. डी. एन. ए. चाचणीसाठी पोलिसांनी डॉक्टरांकडून त्याचा रक्ताचा नमुना काढून घेतला. तिचे रक्त, त्या अर्भकाचे रक्त आणि त्याचे रक्त रासायनिक पृथ:करणासाठी रासायनिक प्रयोगशाळेकडे पाठवले.
यथावकाश न्यायालयात खटला चौकशीसाठी उभा राहिला. आरोपीने सर्व आरोप नाकारले. डी. एन. ए. चाचणीचा अहवाल आला नव्हता. आरोपी कारागृहात असल्यामुळे खटला सुनावणीसाठी नेमण्यात आला. आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा त्यावेळी नव्हता. कोणत्याही परिस्थितीत त्या खुन्याला शिक्षा झालीच पाहिजे असे तिचे आई-वडील प्रत्येकवेळी रडत म्हणायचे. मी आतून अस्वस्थ झालो होतो. त्यांना काय उत्तर द्यावे हेच समजत नव्हते. कशीबशी त्यांची समजूत काढून त्या गरीब आई-वडिलांना परत पाठवत होतो. माझे अंतर्मन म्हणत होते - ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे !’
अखेर डी. एन. ए. चाचणीचा अहवाल आला. त्या गर्भाचा तोच वडील आहे, यावर शिक्कामोर्तब करणारा तो अहवाल होता. त्या बाईला मी ओळखतच नाही, हा आरोपीचा बचाव खोटा ठरला. आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झाली.
वाचक हो, लक्षात ठेवा. भगवान के पास देर है, लेकीन अंधेर नही है’ सर्वात मोठा न्यायाधीश वर बसला आहे. पाप केल्यानंतर पाप्याला तो सजा देतोच. सजा कधी द्यायची याबद्दलचे त्याचे वेळापत्रक मात्र फक्त त्यालाच माहीत !
त्या मुलाची आई जरी बेवफा असली तरी त्या दगाबाज बापाला त्या वरच्या सर्वश्रेष्ठ न्यायाधीशांनी अद्याप जन्म न घेतलेल्या त्या बच्चाकडून जन्मठेपेला पाठवलेच.
- अॅड. धनंजय माने
(लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.)