सोलापूर क्राइम ; टेंभुर्णीत स्टेट बँकेची शाखा फोडणारे चौघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 02:01 PM2018-07-27T14:01:40+5:302018-07-27T14:04:11+5:30
सोलापूर : टेंभुर्णी येथील भारतीय स्टेट बँकेची शाखा गॅसकट्टरने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाºया चौघा आरोपींना मुंबई येथून गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई २५ जुलै रोजी रात्री करण्यात आली.
आमरुद्दीन जहीर शेख (वय २४, रा. डैकयत होला, राजमहल पोलीस ठाणे, जि. साहेबगंज, झारखंड), नाजीर ओनीस शेख (वय ३५, रा. बेगमगंज), साजन मोहबुल शेख (वय ३४, रा. बेगमगंज), सौदागर समशेर शेख (वय ३२, रा. बेगमगंज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक नियुक्त करुन सूचना दिल्या होत्या.
पंढरपूर आषाढी वारी बंदोबस्तात पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांना टेंभुर्णी येथील भारतीय स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न करणारे आरोपी हे मुंबईत असल्याची माहिती मिळाली होती. त्याबाबत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना कळवून आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंबईत खंडणीविरोधी प्रकटीकरण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने वाडीबंदर येथे कोम्बिंग आॅपरेशन केले असता, त्या चौघा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, टेंभुर्णी येथे बँक फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चार मोबाईल जप्त करून टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
यांनी केली कामगिरी
- पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत, सपोनि सुनील पवार, स्थानिक गुन्हेचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे, पोलीस हवालदार सर्जेराव बोबडे, राजशेखर निंबाळे, पोलीस नाईक सूरज जाधव, पोकॉ. पांडुरंग काटेयलपल्ले, खराडे आदींनी ही कामगिरी केली.