सोलापूर क्राईम; नववीत शिकणाºया मुलाने केला दुसरीतील मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 04:36 PM2018-11-21T16:36:25+5:302018-11-21T16:38:22+5:30
घरकूल परिसरातील घटना : अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात
सोलापूर : इयत्ता दुसरीत शिकणाºया सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी इयत्ता नववीमध्ये शिकणाºया अल्पवयीन मुलावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विडी घरकुल परिसरात हा प्रकार घडला असून, मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीची आई व मुलाची आई या दररोज विड्यांचा माप देण्यासाठी जात होत्या. दिवाळीपूर्वी दुपारच्या सुमारास दोघी विड्यांचा माप देण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, घरात कोणी नसल्याचे पाहून अल्पवयीन मुलाने मुलीस खेळत खेळत स्वत:च्या घरात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार दोन ते तीन वेळा घडला होता. शनिवारी दुपारी पुन्हा दोघांच्या आई विड्यांचे माप देण्यासाठी गेल्या होत्या. घरात कोणी नव्हते, ही संधी साधून अल्पवयीन मुलाने पुन्हा मुलीस घरात नेले तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला त्रास होत होता. हा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला खासगी रूग्णालयात नेले. ३ ते ४ हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी नेले असता त्यांनी लहान मुलीची केस आहे, तिला बालरोग तज्ज्ञांकडे घेऊन जाण्यास सांगण्यात आले.
सात रस्ता येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये मुलीला घेऊन जाण्यात आले. तेथील डॉक्टरांनी हा गंभीर प्रकार असून तिला शासकीय रूग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मुलीला पुन्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा तेथील डॉक्टरांनी पहिल्यांदा पोलिसांत नोंद करा, मगच मुलीचा उपचार करू असे सांगितले. मुलीला त्रास होत होता, त्यामुळे आईवडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनंतर मुलीवर उपचार करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलास बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
खासगी डॉक्टरांची पाठ
मुलगी लहान असून, तिला या प्रकारामुळे वेदना होत आहेत. वेदनेने विव्हळत असताना एकाही खासगी डॉक्टराने मुलीला तपासले नाही. शेवटी जेव्हा पोलिसांत फिर्याद दिली तेव्हा शासकीय रूग्णालयात तिला उपचारासाठी घेण्यात आले.