सोलापूर-दिल्ली प्रवास होणार सुपरफास्ट; दिल्लीसाठी उद्यापासून साप्ताहिक एक्सप्रेस धावणार
By Appasaheb.patil | Published: October 14, 2022 04:16 PM2022-10-14T16:16:10+5:302022-10-14T16:16:20+5:30
दिलासादायक : हुबळी-निजामुद्दीन साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू
सोलापूर : सोलापुरातील रेल्वे प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाकडून दिवाळी भेट जाहीर झाली असून, ही दिवाळी भेट म्हणजे सोलापूरकरांचा दिल्लीपर्यंतचा प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. दरम्यान, साप्ताहिक हुबळी-निजामुद्दीन एक्स्प्रेस शनिवारपासून धावणार असून सोलापूरहून दिल्ली प्रवास करणाऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे.
सोलापूरहून दिल्लीस जाण्यासाठी कर्नाटक एक्स्प्रेस केवळ एकच रेल्वे आहे. त्यामुळे दिल्लीकडे जाण्यासाठी नवीन रेल्वेची अत्यंत आवश्यकता होती. म्हणून हुबळी-नवी दिल्ली ही रेल्वे सेवा सोलापूर मार्गे करावी जेणेकरून कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्यांतील प्रवाशांना याचा लाभ होईल, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्या मागणीस यश आले असून हुबळी-निजामुद्दीन-हुबळी ही नवी साप्ताहिक रेल्वे सोलापूरमार्गे दिल्लीस जाण्याची सुविधा होणार आहे.
-------------
असा आहे गाडीचा वेळ...
हुबळी येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हुबळी-निजामुद्दीन-हुबळी या नव्या रेल्वेस झेंडा दाखवून सुरुवात केली. सोलापूरमार्गे दिल्लीस जाण्यासाठी प्रत्येक शनिवारी सकाळी ८:३५ वाजता तसेच सोलापूरहून हुबळीकडे जाण्यासाठी प्रत्येक सोमवारी रात्री ७ वाजता रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.
----------
उत्तर व दक्षिण भारताचा प्रवास सुखकर
उत्तर भारत व दक्षिण भारत (हुबळी) कडे जाण्यासाठी दुसरी रेल्वेसेवा उपलब्ध झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी होती. हुबळीहून दिल्लीला पोहोचण्यासाठी ३५ तासांचा कालावधी लागणार आहे. कमी वेळेत जास्त अंतर पार करणारी ही एक्स्प्रेस असणार आहे.
-----------
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडून सोलापूरकरांना दिवाळी भेटच मिळाली आहे. मागील तीन वर्षांपासून मी सातत्याने ही गाडी सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न केले होते. त्याला यश आले. कर्नाटक एक्स्प्रेस शिवाय ही दुसरी रेल्वे गाडी दिल्लीस जाण्यासाठी सुविधा होणार आहे. सध्या ही गाडी साप्ताहिक असून, ही गाडी दररोज सुरू करण्याची मागणी करणार आहे.
- खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार, सोलापूर.