Solapur: कार्तिकीत दर्शन रांगेत भाविकांना मिळणार २४ तास चहा अन खिचडी
By काशिनाथ वाघमारे | Published: November 20, 2023 07:26 PM2023-11-20T19:26:11+5:302023-11-20T19:26:43+5:30
Solapur: यंदाच्या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगेत थांबणा-या भाविकांना मिनरल वॉटर, चहा, खिचडीबरोबर २४ तास जेवण वाटप करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
- काशिनाथ वाघमारे
सोलापूर - यंदाच्या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगेत थांबणा-या भाविकांना मिनरल वॉटर, चहा, खिचडीबरोबर २४ तास जेवण वाटप करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
कार्तिकी यात्रेला अंदाजे १० लाख वारकरी भाविक येतात. त्यांना पुरेशा प्रमाणात सोई-सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दर्शनरांगेत बॅरेकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर, फॅन, मिनरल वॉटर, चहा, खिचडी वाटप करण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच ४ दिवस पत्राशेडमध्ये २४ तास मोफत भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी २००० अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक सेवा करत आहेत.
आपत्कालीन व सुरक्षा व्यवस्थेसाठी ज्ञानदा फाऊंडेशन पुणे यांच्यामार्फत प्रशिक्षण, सोलापूर महानगरपालिकेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह, सिझफायर यंत्रणा, चंद्रभागा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बॅग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलिसी आदी व्यवस्था केली आहे.
देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती, ऑनलाईन देणगीसाठी क्युआर कोड, सोने-चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत.
अनुभवी पर्यवेक्षकाची नियुक्ती
दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविक असतात. या भाविकांसाठी दर्शन रांग जलद व द्रुतगतीने चालविणे आवश्यक आहे. त्यासाठी दर ५० मीटर अंतरावर अनुभवी पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.