सोलापुरात धो...धो...; २४ तासात पडला ५६.७ मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:29 PM2020-07-31T12:29:56+5:302020-07-31T12:37:54+5:30
मध्यरात्री अचानक मेघगर्जनेसह झाला जोरात पाऊस; गडगडाट आवाजाने नागरिक भयभीत
सोलापूर : सोलापूर शहर व परिसरात गुरूवारी मध्यरात्री पडलेल्या धो-धो पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मागील २४ तासात शहरात ५६.७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे़ दरम्यान, दोन इंचापेक्षा अधिक पाऊस पडला आहे.
दरम्यान, गुरूवारी दिवसभर कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागलेल्या सोलापूरकरांना गुरूवारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे, मात्र मोठया प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शहरातील बºयाच भागातील घरामध्ये पाणी शिरले आहे़ त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे, याशिवाय रात्री पडलेल्या पावसामुळे अनेक भागातील वीज गायब झाली होती, मात्र पाऊसाचा वेग कमी झाल्यावर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला़ गुरूवारी मध्यरात्री मोठया प्रमाणात विजेच्या प्रचंड गडगडाटासह आडवा तिडवा बेफाम पाऊस सुरू झाला. पावसाचे रुद्ररूप पाहून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. जवळपास दीड ते दोन तास पाऊस कमी अधिक प्रमाणात कोसळला.
ग्रामीण भागात पडले होते धुके...
शहरात मोठया प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी सहा ते सात च्या सुमारास शहर परिसरात व ग्रामीण भागात धुक्याची चादर पसरली होती़ रस्त्यांवर मोठया प्रमाणात पडलेल्या धुक्यांमुळे काही वेळासाठी सोलापूर-विजापूर, सोलापूर-पुणे, सोलापूर-हैद्राबाद व इतर मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.