सोलापूर जिल्ह्यात ३०४ गावांत ‘एक गाव एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:08 PM2018-09-03T12:08:06+5:302018-09-03T12:10:03+5:30
यंदा जिल्ह्यातील ३०४ गावांमध्ये एकच गणराय विराजमान होणार
सोलापूर : जिल्ह्यातील सर्व गावकरी मिळून एकच गणपती बसवून गावामध्ये एकोपा निर्माण करत आहेत. ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेनुसार यंदा जिल्ह्यातील ३०४ गावांमध्ये एकच गणराय विराजमान होणार आहेत.तर जिल्ह्यात २ हजार ७५१ गणपतीची प्रतिष्ठापना होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
गावांमध्ये गणेशोत्सव काळात गट-तट निर्माण होऊन वाद निर्माण होतात. त्यातून गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये ही योजना राबविण्यात येते. पोलीस स्टेशनमार्फत हद्दीतील गावांमध्ये बैठक घेऊन ‘एक गाव एक गणपती’ संदर्भात प्रबोधन करण्यात आले. त्यानुसार यंदा जिल्ह्यातील तीस पोलीस स्टेशनच्या हद्दीपैकी २५ पोलीस स्टेशन हद्दीतील ३०४ गावांमध्ये एकच गणपती बसविण्यात येणार आहे. मागील वर्षी २ हजार ७२० श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तसेच ३३४ गावात ‘एक गाव एक गणपती’ योजना राबविण्यात आली होती.
प्रत्येक गावात पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या बैठका होत आहेत. त्यात गणेश मंडळांना डॉल्बीचा वापर करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. शिवाय डॉल्बीधारकासोबत पोलीस अधिकाºयांनी बैठका घेतल्या आहेत. गणेश मंडळाकडून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, गणेशोत्सव परवाना,शिस्त, नियम व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने विविध उपाययोजनांबाबत ग्रामीण पोलिसांच्या वतीने शांतता कमिटीच्या बैठकांच्या माध्यमातून गणेश मंडळातील पदाधिकाºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
डॉल्बीमुक्तीसाठी विशेष प्रयत्न
- जिल्ह्यात सर्वच गावातील गणेशोत्सवावर होणारा मोठा खर्च टाळण्यासाठी ‘एक गाव एक गणपती’बरोबर डॉल्बीमुक्तीसाठी ग्रामीण पोलीस प्रयत्न करत आहेत. त्याला प्रोत्साहन मिळत असून गणेश मंडळांनी डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्याचा वापर करावा असे आवाहन ही करण्यात आले आहे.
गणेश मंडळांना बक्षीस देणार
- यंदा गणेश मंडळांनी वर्गणीतून वृक्ष लागवड, समाज, शिक्षणासाठी खर्च करावा. अशा गणेश मंडळांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांकडून तीन तर पोलीस उपविभागीय कार्यालयाकडून दोन बक्षीस गणेश मंडळांना देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
तीन तालुक्यांत मोठ्या मिरवणुका
१३ ते २३ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात गणेश उत्सव साजरा होणार आहे. श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकाया पाचव्या दिवसांपासून सुरु होतात. २३ आॅगस्ट हा गणेश विसर्जनाचा मुख्य दिवस आहे. सोलापूर ग्रामीण भागात बार्शी,अक्कलकोट व पंढरपूर या ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मोठ्या मिरवणुका काढल्या जातात.
धर्मादाय आयुक्तांची परवानगी आवश्यक
गणेश मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यांची परवानगी नसेल तर वर्गणी गोळा करता येणार नाही. जर असे कोणी केले तर संबंधित गणेश मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे.