सोलापूर जिल्हा प्रशासन चिंतेत; गर्दीच्या ठिकाणांवर कडक निर्बंध असताना कारवाई का होईनात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 01:31 PM2021-03-16T13:31:34+5:302021-03-16T13:31:39+5:30
मर्यादेपेक्षा जास्त गर्दी असलेल्या लग्न समारंभांवर कारवाई करा; जिल्हा प्रशासन चिंतित : आदेशाची अंमलबजावणी का होईना
सोलापूर : गर्दीच्या ठिकाणांवर कडक निर्बंध असताना कारवाई का होईनात? याबाबत प्रशासनाने चिंता व्यक्त केली असून, मर्यादेपेक्षा जास्त गर्दी असलेले मंगल कार्यालये तत्काळ बंद करा. वेळप्रसंगी लग्न समारंभांवर कारवाई करा, असे आदेश जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज बैठक घेतली. त्या बैठकीत कोरोना प्रसार रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली. आज झालेल्या चर्चेनुसार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना अहवाल सादर केला जाणार आहे. पालकमंत्री भरणे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येणार असून, ते अंतिम निर्णय घेणार आहेत.
नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपायुक्त वैशाली कडूकर आदी उपस्थित होते. बैठकीत मंगल कार्यालयाबरोबरच आठवडी बाजार, जनावरांचे बाजार बंद करणे, मंदिरातील भाविकांच्या संख्येवर मर्यादा आणणे, परमिट रुम, जिम्नैशिअम, बागा, अन्नछत्र मंडळ बंद ठेवणे, दुकानांच्या वेळा, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाच्या कडक निर्बंध आणावेत, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, शमा ढोक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, लस समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी राहुल देसाई, प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय राठोड, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांच्यासह गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, आरोग्य, पोलीस, प्रादेशिक परिवहन, अन्न आणि औषध प्रशासन, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.