सोलापूर जिल्हा बँक ; केडर बरखास्ती लटकली न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:01 PM2018-03-09T14:01:43+5:302018-03-09T14:01:43+5:30
जिल्हा बँक अखत्यारित केडर बरखास्तीवर उच्च न्यायालयात तर अवसायक नियुक्ती डी.डी.आर.कडे प्रलंबित
सोलापूर: जिल्हा बँक अखत्यारित केडर बरखास्तीवर म्हणणे मांडण्यास शासनाच्या वतीने मुदत मागितल्याने उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, अवसायक नेमण्याच्या आदेशाची सुनावणी जिल्हा उपनिबंधकाकडे सुरू आहे.
जिल्हा बँक अखत्यारित केडर बरखास्त करून प्रशासक नियुक्तीचा निर्णय जिल्हा उपनिबंधकांनी घेतला होता. कार्यकारिणीची मुदत संपल्यानंतरही वेळेत निवडणूक घेतली नसल्याने केडर बरखास्तीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला सहनिबंधक पुणे यांच्याकडे अपील दाखल केले होते. सहनिबंधकांनी जिल्हा बँकेचे अपील फेटाळल्याने बँकेने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. यावर जिल्हा बँकेने आपली बाजू मांडली.
या दरम्यान जिल्हा उपनिबंधकांनी केडरवरील प्रशासकही रद्द करून अवसायकाची नेमणूक केली आहे. बँकेने अवसायकाची नियुक्ती केल्याचा आदेशही न्यायालयाला सादर केला आहे. केडर बरखास्तीच्या निर्णयावर उच्च न्यायालयात सुनावणीसाठी जिल्हा उपनिबंधकांच्या वतीने न्यायालयात म्हणणे सादर करायचे आहे. मागील दोन सुनावणीवेळी जिल्हा उपनिबंधकाच्या वतीने म्हणणे मांडण्यास वेळ मागितला आहे.
दरम्यान, केडरवरील प्रशासक रद्द करून अवसायक नेमण्याच्या आदेशावर जिल्हा बँकेने जिल्हा उपनिबंधकाकडे अपील दाखल केले आहे, यावरही सुनावणी पुढे ढकलली आहे. २८ फेब्रुवारी रोजी होणारी सुनावणी ७ मार्च रोजी होणार होती; मात्र जिल्हा उपनिबंधक रजेवर असल्याने ही सुनावणी आता १२ मार्च रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले.
संजय काकडे यांच्यावरच भार
च्विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांच्याकडे नियमित कामकाजाची जबाबदारी आहेच. याशिवाय केडरचे प्रशासक तेच होते तर त्यांच्याकडेच अवसायकाची जबाबदारी आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक म्हणून ते कामकाज करीत असतानाच बाजार समितीच्या लेखापरीक्षणाची जबाबदारीही तेच पार पाडत आहेत.