सोलापूर जिल्हा बँक ‘केडर’ ला चौकशीचा फेरा
By Admin | Published: March 31, 2017 02:27 PM2017-03-31T14:27:20+5:302017-03-31T14:27:20+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सचिवांचे जिल्हा देखरेख संघ अर्थात केडरच्या मागे चौकशीचा फेरा सुरू झाला आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी चार पथके तयार केली असून, केडरला दप्तराची मागणीही केली असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा मध्यवर्ती बँक व त्या अंतर्गत असलेल्या विकास सोसायट्यांचा कारभार सहकार खात्यापेक्षा त्या-त्या तालुक्याच्या वजनदार संचालकांच्या इशाऱ्यावर चालतो. त्यामुळेच जिल्हा बँकेच्या संचालकांच्या इशाऱ्यावर पाहिजे त्यांना मुबलक कर्ज वाटले तर विरोधकांंना क्षमता असूनही कर्ज दिले जात नाही. आज चुकीच्या कर्ज वाटपामुळेच जिल्हा बँक अडचणीत आली आहे. यामुळेच केडरची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. ही बाब सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मनावर घेऊन जिल्हा उपनिबंधकांना सचिवांच्या केडरची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी करण्याची रितसर मागणी उत्तर सोलापूर तालुका भाजपाचे अध्यक्ष काशिनाथ कदम यांनी केली होती. कदम यांच्या तक्रारीच्या आधारे जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनी जिल्हा विशेष लेखा परीक्षक विष्णू डोके यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून आठवडाभरात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
-----------------------
उत्तरच्या संस्था सहकारमंत्र्यांच्या रडारवर
च् उत्तर सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपा युती झाली होती. युतीच्या प्रचाराच्या सभेत जि.प. माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी केडर बरखास्त करण्याची मागणी केली होती.
- सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. या शिवाय तालुक्यातील अन्य सहकारी संस्थांचीही चौकशी करण्यात येईल असे देशमुख म्हणाले होते.
- बाजार समितीच्या चौकशीनंतर आता उत्तर तालुक्यातील सहकारी संस्था सहकार मंत्र्यांच्या रडारवर आहेत.
- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील वर्षीच्या लेखा परीक्षणातही गंभीर दोष आढळल्याने संचालक मंडळ अडचणीत आले असून त्याच्या चौकशीसाठी नोटिसा काढण्यात आल्या आहेत.
-----------------
चौकशीसाठी पथक तयार करण्यात आले असून मार्च अखेरमुळे दोन दिवसानंतर चौकशीला सुरुवात होईल. आठवडाभरात दप्तराची तपासणी होईल. १० मुद्यांवर चौकशी केली जाईल.
-विष्णू डोके
जिल्हा विशेष लेखा परीक्षक
------------------
देखरेख संघ केडरबाबत अनेक तक्रारी आहेत. गटसचिवांच्या भरतीचे अधिकार नसताना बेकायदेशीर भरती केली आहे. प्रशासक नेमलेल्या संस्थांचे दप्तर सचिवांनी प्रशासकांना दिले नाही. सेवानिवृत्त होऊनही मर्जीतील सचिवांना मुदतवाढ दिली आहे.
-काशिनाथ कदम
तक्रारकर्ता, भाजपा तालुकाध्यक्ष