नाबार्डच्या १५ लाखांवर सोलापूर जिल्हा बँकेने सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:38 PM2018-12-08T12:38:25+5:302018-12-08T12:39:54+5:30
सोलापूर : मोबाईल व्हॅन खरेदीमध्ये चालढकल झाल्यामुळे ती खरेदी करण्यासाठी नाबार्डने १५ लाखांची रक्कम अन्य बँकेला वर्ग केल्याचे सांगण्यात ...
सोलापूर: मोबाईल व्हॅन खरेदीमध्ये चालढकल झाल्यामुळे ती खरेदी करण्यासाठी नाबार्डने १५ लाखांची रक्कम अन्य बँकेला वर्ग केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा बँकेला आता या रकमेवर पाणी सोडावे लागत आहे.
खेड्यापाड्यात बँकिंग सेवा मिळावी तसेच बँकेच्या सोईसुविधांची माहिती देण्यासाठी नाबार्डने काही जिल्हा बँकांना ‘मोबाईल व्हॅन’खरेदीसाठी निधीची तरतूद केली होती. यामध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला १५ लाख रुपये दिले होते. सप्टेंबर २०१७ मध्ये ही मंजुरी दिली होती. आॅगस्ट २०१८ पर्यंत बँकेने मोबाईल व्हॅन खरेदी करावयाची होती.
दिलेल्या मुदतीत बँकेने व्हॅन खरेदी केली नसल्याने नाबार्डने एक महिन्याची मुदतवाढ दिली. या कालावधीतही व्हॅन खरेदीसाठी बँकेने हालचाल केली नाही. यामुळे नाबार्डने हे पैसे अन्य जिल्हा बँकेला वर्ग केले. व्हॅन खरेदीला वर्षभरात बँकेला मुहूर्तच मिळाला नसल्याने या निधीवर बँकेला पाणी सोडावे लागले. मुदतवाढ दिल्यानंतरही मोबाईल व्हॅनची खरेदी न करता ४५ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी बँकेने केली, मात्र नाबार्डने हा प्रस्ताव रद्द केला.
नाबार्डने मोबाईल व्हॅनसाठी जिल्हा बँकेला १५ लाख रुपये दिले होते. बँकेकडून व्हॅन खरेदीसाठी प्रतिसाद मिळाला नसल्याने हा निधी नाबार्डने अन्य बँकेला वर्ग केला. व्हॅनच्या माध्यमातून बँकेच्या सुविधा शाखा नसलेल्या गावातही देता आल्या असत्या.
- प्रदीप झिले,
व्यवस्थापक, नाबार्ड सोलापूर
नाबार्डने दिलेल्या निधीतून सुरुवातीला मोबाईल व्हॅन खरेदीवर सकारात्मक चर्चा झाली नाही. नंतर प्रचार व प्रसारासाठी ही गाडी उपयोगात येणार असल्याने तयारी झाली, मात्र नाबार्डने रद्द केल्याचे कळविले आहे.
-किसन मोटे,
सरव्यवस्थापक जिल्हा मध्यवती
सहकारी बँक
एटीएमची सुविधाही..
- या व्हॅनमध्ये एटीएमची सुविधा दिली जाणार होती. आठवडा बाजारात व्हॅनद्वारे बँकेच्या सुविधांबाबत माहिती देणे, ठेवी स्वीकारणे,नवीन खाते उघडण्याची सुविधा मिळणार होती. ज्या गावात शाखा नाही अशा खेड्यापाड्यात स्क्रीनद्वारे बँकिंगची माहिती देता आली असती.