सोलापूर जिल्हा निवडणूक कार्यालयाने मागवली विधान परिषदेच्या पात्र मतदारांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 05:01 PM2021-10-13T17:01:44+5:302021-10-13T17:03:20+5:30
हालचाली सुरू : ७५ टक्के मतदार पात्र असतील तर हाेणार निवडणूक
साेलापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयाेगाने जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून मतदारांची माहिती मागविली आहे. त्यानुसार पात्र सदस्यांची माहिती निवडणूक कार्यालयाला कळवा, असे पत्र तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना मंगळवारी पाठविले.
विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह राज्यातील आठ विधान परिषद आमदारांची मुदत १५ डिसेंबरला संपत आहे. विधान परिषदेसाठी महापालिका व नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती मतदार असतात. जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्येच्या ७५ टक्के मतदार पात्र असतील तर निवडणूक घेता येते असे निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने आठ मतदारसंघांतील मतदारांची माहिती मागविली आहे. निवडणूक कार्यालयाचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी यांनी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी यांना पात्र मतदारांची माहिती कळवा, असे सांगितले आहे. साेलापूर महापालिकेत शिवसेना आणि भाजपचे एक-एक सदस्य अपात्र ठरले आहेत. एका सदस्याचे निधन झाले आहे. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, माेहाेळ नगरपालिकेतील सदस्यांची मुदत संपली आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी किती मतदार पात्र ठरतात याकडे लक्ष आहे.
--
विधान परिषदेसाठी राजन पाटील, खरटमल यांचेही नाव
विधान परिषदेसाठी भाजपकडून आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून माजी आमदार दिलीपराव माने यांच्या नावाची पूर्वीपासून चर्चा आहे. यादरम्यान राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाकडून माजी आमदार राजन पाटील, काँग्रेसमधून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले सुधीर खरटमल यांच्याही नावाची चर्चा आहे. खरटमल यांना सहकार्य करण्यास काँग्रेसचा एकही तयार झाल्याची चर्चा आहे.
-