सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख ८0 हजार जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 05:09 PM2018-10-23T17:09:23+5:302018-10-23T17:12:03+5:30
वैरण विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक पशुपालकांना वैरण विकास कार्यक्रमांतर्गत ६00 रुपयांचे बियाणे देण्याचा निर्णय झेडपीच्या पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत वैरण विकास कार्यक्रमांतर्गत पशुपालकांना बियाणे देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. डीपीसीमधून या कार्यक्रमासाठी १ कोटीची तरतूद केली जाते. पण यंदा टंचाई स्थिती असतानाही फक्त ५0 लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. उर्वरित ५0 लाख रुपये तातडीने मिळावेत अशी मागणी करण्यात आली.
हिवाळ्यात दुभत्या जनावरांना लाळ्या—खुरकत रोगांची मोठ्या प्रमाणावर लागण होते व त्यात बरीचशी जनावरे बळी पडतात. त्यामुळे याबाबत लसीकरण राबविण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर दैवज्ञ यांनी दिली. यासाठी साडेतीन लाख लस खरेदी करण्यात आली आहेत. सर्व पशुवैद्यक केंद्रांकडे ही लस उपलब्ध करण्यात आली असून, शिबीर घेऊन लसीकरण करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. त्यावर सदस्यांनी गतवर्षी असा कार्यक्रम घेण्यात आला, पण बºयाच जनावरांना ही लस उपलब्ध झाली नसल्याची तक्रार केली.
गतवर्षी लस उपलब्ध झाल्या नाहीत. स्थानिक स्तरावर लस खरेदी करण्यात आल्या. या खरेदीत गोंधळ झाला. यावेळेस मात्र ही स्थिती होऊ नये अशी मागणी केली. बैठकीला भारत शिंदे, ऋतुजा मोरे, सुनंदा भासगी, शेखर गाडे उपस्थित होते.
जिल्ह्यात गाय, म्हैस संवर्गातील सुमारे ११ लाख ८0 हजार जनावरे आहेत. यासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन लाख लाळ्या—खुरकत प्रतिबंधक लसी खरेदी करण्यात आल्या आहेत. ही लस सर्व जनावरांना मिळावी अशी व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे मत सदस्यांनी मांडले. वैरणीसाठी पशुपालकांना जनावरांची संख्या व पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे वैरणीसाठी बियाणे देण्यात येणार आहे. यात ५0 टक्के रक्कम बियाणे तर ५0 टक्के रक्कम गाजरगवत, घास खरेदीसाठी देण्यात येणार आहे.