सोलापूर जिल्हा दूध संघातील एजंट हद्दपार, थेट दूध खरेदी होणार, शेतकऱ्यांना लाभ
By admin | Published: April 18, 2017 06:34 PM2017-04-18T18:34:22+5:302017-04-18T18:34:22+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १८: थेट शेतकऱ्यांना अधिक दर मिळावा यासाठी सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने एजंट व वाहतूक ठेकेदाराचे कमिशन बंद केले असून, संघाच्या कर्मचाऱ्यांमार्फत थेट दूध खरेदीवर भर दिला आहे. यामुळे गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३० रुपये इतका दर थेट शेतकऱ्यांना दिला जात असल्याचे सांगण्यात आले.
सध्या सोलापूर जिल्ह्यात खासगी दूध संघाचे पेव फुटले आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला संघाप्रमाणेच खासगी संघ दर देत असून एजंटांना(संकलन करणाऱ्यांना) अधिक कमिशन दिले जात आहे. खासगी संघाकडून एजंटांना अधिक कमिशन दिले जात असल्याचे खासगी डेअरीचालक अधिक दूध गोळा करण्यासाठी प्रयत्न करतात. याचा फायदा शेतकऱ्यांना कमी अन् एजंटांना अधिक होत असतानाही सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संकलनावर परिणाम होत आहे. अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्हा दूध संघाला दूध देणारे व दूध वाढीसाठी सोलापूर जिल्हा संघाच्या सुविधांचा फायदा घेणाऱ्यांनीच खासगी डेअऱ्यांना दूध पुरवठा सुरू केला आहे. यामुळे अनेक गावातील संस्थांकडून दूध संघाचा दूध पुरवठाच बंद झाला आहे. यामुळे संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक व संचालक मंडळाने एजंटगिरी बंद करण्यावर भर दिला आहे.
यावर सोलापूर जिल्हा दूध संघाने मात करण्याचा निर्णय घेतला असून, संघाच्या कर्मचाऱ्यांमार्फत दूध संकलन सुरू केले आहे. गावोगावी सुरू केलेल्या संकलन केंद्रावर शेतकऱ्यांनाच दुधाचे थेट पैसे दिले जात आहेत. अशा संकलन केंद्रावर गाईच्या दुधाला प्रतिलिटर २९ ते ३१ रुपयांचा दर मिळतो आहे. सध्या ५९ संकलन केंद्रातून थेट दुधाची खरेदी केली जात असून या महिनाअखेर ही संख्या १०० वर जाईल असे सांगण्यात आले. गाईच्या दुधाला २९ ते ३१ रुपये तर म्हशीच्या दुधाला ३८ रुपयांचा दर दूध संघाच्या संकलन केंद्रातून दिला जात आहे.
--------------------------
संघ केंद्रामुळे शेतकऱ्यांचा फायदा
दूध संघाचे कर्मचारी थेट गावात जाऊन दूध गोळा करतात व संघाला पाठवितात. यामुळे दूध संस्थेला मिळणारे कमिशन थेट शेतकऱ्यांना दिले जात आहे. ज्या गावातील संस्था संघाला दूध घालत नाही, अशा ठिकाणी संघ केंद्र सुरू केले जात असल्याचे संघाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांनी सांगितले. अरण येथील ज्ञानदेव गाजरे यांच्या गाईच्या दुधाला ३१ रुपये १० पैसे तर पटवर्धन कुरोलीच्या अनिता उपासे यांच्या म्हैस दुधाला प्रतिलिटर ४४ रुपये ३० पैसे दर मिळाल्याचे दूध संघाकडून सांगण्यात आले.
-------------------
एजंट व वाहतूक ठेकेदारांचे कमिशन बंद केल्याने ते पैसे थेट शेतकऱ्यांना दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना गाय व म्हैस दुधाला अधिक दर मिळू लागला आहे. यामुळे गावागावातून संघ केंद्र सुरू करण्याची मागणी वाढू लागली आहे.
- प्रशांत परिचारक,
अध्यक्ष, सोलापूर दूध संघ