सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणूक; जागा वाटपासाठी बोलाविलेली बैठक संपली निष्फळ चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 05:26 PM2022-02-13T17:26:55+5:302022-02-13T17:27:01+5:30
दूध उत्पादक म्हणाले, आमच्याकडे द्या सत्ता
सोलापूर : जिल्हा दूध संघांची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक चार तासांच्या चर्चेनंतर निर्णयाविना आटोपती घेण्यात आली. दूध उत्पादकांनी सत्तेची सूत्रे आमच्या हाती द्या म्हणून आग्रह धरला, तर त्यावर माजी आमदार दिलीप सोपल यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची दूध संघांची परंपरा असल्याचे सांगितले.
जिल्हा दूध संघांची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विश्रामधाम येथे सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार दिलीप सोपल, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, सिद्धाराम म्हेत्रे, बबनराव आवताडे, मनोहर डोंगरे, रश्मी बागल, सुरेश हसापुरे उपस्थित होते. यावेळी अर्ज भरलेल्या उमेदवारांना तालुकानिहाय कक्षात बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. उत्तरमधून कोणीच आले नव्हते, तर करमाळ्यातून तीन गट आले होते.
बचाव पॅनेलने मागितली सत्ता
निवडणुकीत दूध संघ बचाव कृती समितीच्या माध्यमातून उत्पादकांनी उडी घेतली आहे. या पॅनेलचे प्रमुख भाऊसाहेब धावणे, नदाफ यांनी श्रेष्ठींशी भेट घेऊन चर्चा केली. आतापर्यंत राजकीय मंडळीची दूध संघावर सत्ता होती. संघ वाचविण्यासाठी एकवेळ उत्पादकांनाच्या ताब्यात द्या, असा प्रस्ताव मांडल्याचे धावणे यांनी सांगितले.
बंद खोलीत तासभर चर्चा
बचाव पॅनेल व तालुक्यातील उमेदवारांची मते जाणून घेऊन माजी आमदार सोपल, आमदार शिंदे, माजी आमदार पाटील यांनी बंद खोलीत तासभर चर्चा केली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार दिलीप माने, सिद्धाराम म्हेत्रे, बबनराव आवताडे गप्पा मारत बाहेर कक्षात बसून होते. आमदार संजयमामा शिंदे बैठकीला उशिरा आले. उमेदवारांच्या मुलाखतीनंतर ते निघून गेले. बिनविरोधाला सकारात्मक वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी बैठका घेणार
उमेदवारी माघार घेण्याची मुदत मंगळवारी आहे. आज प्राथमिक चर्चा झाली. बचाव समितीने त्यांचे म्हणणे मांडले आहे. दूध संघाला बिनविरोधाची परंपरा आहे. त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आणखी बैठका घेतल्या जातील, असे माजी आमदार सोपल यांनी सांगितले. उमेदवारी भरतानाच दूध उत्पादकांनी आम्हाला सांगितले असते तर त्यांच्या प्रस्तावावर विचार करता आला असता. आज अचानकपणे त्यांनी हा प्रस्ताव ठेवल्याने विचार करावा लागेल, असे ते म्हणाले.
यांनी लावली हजेरी
करमाळ्याचे विद्यमान संचालक राजेंद्रसिंह राजे भोसले, संचालक दीपक माळी, दक्षिणचे माजी सभापती अशोक देवकते, प्रभाकर कोरे, बार्शीचे योगेश सोपल यांनी चर्चेसाठी हजेरी लावली. दूध संघाच्या निवडणुकीत सोसायट्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे मतदारांची संख्या कमी आहे. मागील निवडणुकीत माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विनंतीवरून बार्शीची जागा सोडून मंगळवेढ्याला द्यावी लागली होती. तशी अडजेस्टमेंट करण्यासाठी नेत्यांशी चर्चा करू, असे सोपल यांनी स्पष्ट केले.