बिबट्यांसाठी सर्वसोयीयुक्त, प्रशस्त अन् खाद्य मिळण्याचे सुरक्षित ठिकाण..सोलापूर जिल्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 02:17 PM2018-11-22T14:17:18+5:302018-11-22T14:19:44+5:30
विस्तार वाढला: सातारा-पुण्यात वसाहती वाढल्यानं उसाच्या शेतीकडं स्थलांतर
विलास जळकोटकर
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात धरणातील मुबलक पाण्यामुळे माळरान क्षेत्रावर ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. माळरान आणि झाडाझुडपांच्या आसºयाने वास्तव्य करणारा बिबट्याचं या परिसराची जागा आता ऊस लागवडीने घेतली आहे. शिवाय बिबट्यांची विस्तार वाढतोय त्यामुळे त्यांच्यात प्रतिस्पर्धा वाढू लागल्यामुळे सह्याद्रीच्याच्या पर्वतरांगातून बिबट्याने जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे. एकूणच बिबट्यांसाठी सर्वसोयीयुक्त, प्रशस्त अन् खाद्य मिळण्याचे सुरक्षित ठिकाण सोलापूर जिल्हा बनतोय, अशी मते वन्यजीवप्रेमी अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
१५ ते २५ किलोमीटरच्या परिसरात १ नर आणि दोन-तीन माद्या एकत्रित राहू शकतात. दिवसेंदिवस त्यांचा विस्तार वाढतो आहे. यामुळे दुसºया बिबट्याला अन्य परिरसराचा आधार घ्यावा लागतो. यातूनच सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर, टेंभुर्णी, करमाळा, माळशिरस ऊस क्षेत्र असलेल्या पट्ट्यात लोकांना दिसू लागल्याचे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. बिबट्या मुळात घनदाट जंगलातील प्राणीच नाही.
वाघाच्या भीतीने तो जंगल परिसरातील गावठाण वस्तीजवळच वास्तव्य करतो. हा आदमखोर (नरभक्षक) नाही. माणसांपेक्षा बिबट्याच माणसाला जास्त घाबरतो. माणसांना बिबट्या जंगलातच राहावा, असं वाटतं. पण जंगलातील वाढते अतिक्रमण, मानवी हस्तक्षेप, अपुरी पडणारी जंगले बिबट्याला मानवी वस्तीजवळ वास्तव्य करण्यास भाग पडतेय. मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा शिरकाव झाला.
त्याच्याकडून अपाय होऊ नये म्हणून लोकांकडून सामूहिक मोहिमेद्वारे त्याला जेरबंद करून जंगलात सोडण्याचा आटापिटा केला जातो. मात्र हा प्रभावी उपाय नाही. त्याची जागा दुसरा एखादा बिबट्या घेतो. त्याला जेरबंद करून प्राणिसंग्रहालयात ठेवले तरी संग्रहालये बिबट्यांनी भरून जातील. मानवाप्रमाणे त्यालाही पृथ्वीवर स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे. यासाठी माणसांनीच आता बिबट्यासमवेत सहवास स्वीकारावा व त्याच्याशी सलगी करण्याची गरज आहे. बिबट्याच्या वास्तव्याची जागा नवनवीन ठिकाणी वाढत चालली आहे.
ऊस हेच त्याचे जंगल बनले आहे. उसाच्या शेतातील पाचोळा सतत जाळल्याने तो नव्या ठिकाणी आश्रय शोधत सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर येऊन ठेपला आहे. बिबट्या-बिबट्यांमधील जागेसाठीची स्पर्धा वाढल्याने महाराष्टÑात सर्वत्र आढळू लागला आहे. यामुळे आता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या लोकांप्रमाणे सोलापूरकरांनीही दक्षता व सहजीवन जगणे आवश्यक बनले आहे.
आला बिबट्या तर ही घ्यावी खबरदारी
- बिबट्या निशाचर प्राणी असून, तो रात्रीच शिकारीसाठी बाहेर पडतो. आपल्यापेक्षा कमी उंचीच्या प्रत्येक प्राण्यास तो आपले भक्ष्य समजतो. त्यासाठी उघड्यावर शौचास बसू नये, शेतात बसून काम करताना एखादी व्यक्ती राखण करण्यासाठी उभा असावा. राखणदार नसेल आणि एकटाच काम करीत असाल तर ५ ते ६ फुटाच्या काठीवर मडके (मानवी मुखवटा) ठेवावे, त्यावर कापड पांघरावे. जेणेकडून बिबट्याला आपल्यापेक्षा उंच असा कोणीतरी आहे, असा आभास निर्माण व्हायला हवा. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडताना बॅटरी व काठी सोबत असावी. काठीला घुंगरू असल्यास अत्युत्तम. कोणतेही साधन नसेल तर मोबाईलवर गाणी किंवा मोठ्यानं गाणं म्हणत चला. रात्रीच्या वेळी अंगणात बसून भांडी घासणे टाळावे. रांगणाºया लहान मुलांना अंगणात एकट्याने सोडू नये.
अचानक बिबट्या समोर आला तर..
- बिबट्या अचानकपणे समोर आला तर घाबरून खाली बसू नये. त्यास दगड मारू नये, शक्यतेवढ्या जोराने ओरडावे. हातात काठी असल्यास जमिनीवर आपटावी. तो निघून गेल्यानंतर त्याचा पाठलाग करू नये, हा महत्त्वाचा सल्ला वन्यजीवप्रेमींनी लोकमतशी बोलताना दिला.
असा असतो बिबट्या
- महाराष्टÑातील बिब्बा या झाडांच्या बियांमुळे माणसांच्या त्वचेवर पुरळ उठून ठिपके तयार होतात. यावरून मराठीत बिबट्या हे नाव पडल्याचे सांगण्यात येते. त्याचा वंश- कणाधारी, जात- सस्तन, वर्ग: मांसभक्षक, शास्त्रीय नाव: पँथेरा पार्डस. यात नराचे वजन ५० ते ८० किलो तर मादीचे ३० ते ३४ किलो असते. नराची लांबी १.३ ते १.४ मीटर तर मादीची लांबी १ ते १.२ मीटर असते.
उसाची शेतीच बिबट्याचं जंगल ठरतंय
- बिबट्याचे वास्तव्य प्रामुख्याने सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पट्ट्यात आढळून यायचं. यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. गेल्या चार-पाच वर्षांत मात्र त्यानं सोलापूर जिल्ह्याकडे मोर्चा वळविला आहे. याचं कारण असं की, या भागात बारमाही ऊस शेती वाढली. त्यालाच जंगल मानून तो त्यास अनुकूल बनला. मग तो वारंवार शेतकºयांच्या नजरेला पडू लागला आणि यामुळे नाहक भीतीचे वातावरण पसरले जातेय. तो आपल्यापेक्षा उंचीने लहान असलेल्या भक्षावरच हल्ला करतो. त्याचे मूळ खाद्य उसात आढळणारे घुशी, रानससे, खेकडे, मोठे उंदीर व परिसरातील कुत्र्यांसह पाळीव प्राणी आहे. माणसाला तो घाबरतो आणि माणूस त्याला. यामुळे अकारण संघर्ष निर्माण होतोय, तो थांबणे आवश्यक असल्याचे वन्यजीवप्रेमी मुकुंद शेटे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.