घरगुती वीज कनेक्शन देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू; वर्षभरात करणार जोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:28 AM2017-11-30T11:28:38+5:302017-11-30T11:30:18+5:30
वाड्या-वस्त्यांवरील तसेच गावातील वीज उपलब्ध नसलेल्या घरांना प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेनुसार (‘सौभाग्य’) वीज कनेक्शन देण्यासाठी गावोगावी सर्वेक्षण करून याद्या सादर करण्यात आल्या आहेत.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर: वाड्या-वस्त्यांवरील तसेच गावातील वीज उपलब्ध नसलेल्या घरांना प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेनुसार (‘सौभाग्य’) वीज कनेक्शन देण्यासाठी गावोगावी सर्वेक्षण करून याद्या सादर करण्यात आल्या आहेत. अशा कुटुंबांना मार्च २०१९ पर्यंत वीज कनेक्शन देण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने वाड्या-वस्त्यांवरील तसेच गावातील वीज उपलब्ध नसलेल्या घरांना वीज कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर ‘सौभाग्य’ ही योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार ज्या घरात वीज नाही अशा कुटुंबांची माहिती ग्रामपंचायतीने पंचायत समित्यांना सादर करावयाची आहे. ही यादी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत वीज मंडळाकडे जाणार असून त्यांच्याकडून सर्वेक्षण करून कनेक्शन देण्याची कार्यवाही होणार आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी मोफत तर दारिद्र्यरेषेवरील कुटुंबाकडून ५०० रुपये अनामत रक्कम घेऊन कनेक्शन देण्यात येणार आहेत.
------------------------------
दक्ष असलेल्या गावांनाच..
- सर्वसामान्यांसाठी शासनाच्या अनेक योजना येतात; मात्र त्याचा फायदा ठराविकच गावातील जनतेला होतो. त्याचे कारण त्या गावचे पदाधिकारी, ग्रामपंचायत व ग्रामसेवक दक्ष असतात. अनेक ग्रामसेवकाला गावातील कुटुंबांची खडान्खडा माहिती असते. अशा गावातील नागरिकांना घरबसल्या अनेक योजनांचा लाभ होतो. याही योजनेचे असेच होऊ नये यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकांनी दक्ष राहून वीज कनेक्शन नसलेल्या सर्वच कुटुंबाच्या याद्या करणे अपेक्षित आहे.
--------------------
मान्यता घ्यावी लागणार
- ग्रामपंचायतीने सर्वेक्षण करून तयार केलेल्या वीज कनेक्शनसाठी पात्र कुटुंबांच्या यादीला नोव्हेंबरच्या ग्रामसभेत मंजुरी घ्यावी असे शासनाच्या आदेशात म्हटले आहे. यामुळे वीज कनेक्शन नसलेले एकही कुटुंब योजनेपासून वंचित राहणार नाही.