औषध खरेदीसाठी सोलापूर जिल्ह्याला मिळणार १०% अनुदान मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:32 PM2018-06-08T14:32:47+5:302018-06-08T14:32:47+5:30
सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांची माहिती, आरोग्य उपसंचालकांनी दिले आश्वासन
राकेश कदम
सोलापूर : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य भांडारात पुरेसा औषध साठा आहे. यात्रेनंतर औषधांचा तुटवडा जाणवू शकतो. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा उपसंचालक (पुणे) डॉ. संजय देशमुख यांनी जिल्हा स्तरावर औषध खरेदीसाठी १० टक्के अनुदान मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांनी दिली.
आषाढी यात्रेपूर्वी आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या जिल्ह्यात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहे. परंतु, प्रश्न मार्गी लागत नाही. यासंदर्भातील वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. यानंतर राज्यस्तरावरील यंत्रणा जागी झाली.
आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, आरोग्य सेवाचे संचालक डॉ. संजीव कांबळे आणि उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांच्याकडून अहवाल मागवून घेतला. डॉ. अंदूरकर यांनी तातडीने ३२ प्रकारच्या औषधांची यादी पाठवून दिली. डॉ. जाधव यांच्याकडून पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. आता वारीच्या तयारीसाठी आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, आरोग्य संचालकांच्या उपस्थितीत विशेष बैठकही आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे.
डॉ. अंदूरकर म्हणाले, पालखी मार्गावरील पंढरपूर, अकलूज, नातेपुते या रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा आहे. इतर ग्रामीण रुग्णालयांमध्येही पुरेशी औषधे आहेत. वारीनंतर तुटवडा जाणवू शकतो. जिल्हा आरोग्य यंत्रणेला औषध खरेदीसाठी ठराविक अनुदान मिळते. तातडीच्या वेळी १० टक्के अनुदानातून जिल्हास्तरावर औषध खरेदी करता येते. आरोग्य उपसंचालक डॉ. देशमुख यांनी १० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन दिले.
पालखी मार्गावरील सर्व शासकीय रुग्णालयात आणि उपचार केंद्रांमध्ये औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मागील काही दिवसांत दुर्मिळ शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली औषधे, साधने येण्यास उशीर होत असल्याचेही त्यांनी मान्य केले.
जिल्हा परिषदेत ठराव
- आषाढी यात्रा आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये औषधांचा तुटवडा जाणवू शकतो. दक्षता म्हणून आरोग्य राज्यमंत्री देशमुख यांना निवेदन देण्याचा ठराव आरोग्य समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला. हाफकीन जीव औषधी मंडळाऐवजी जिल्हास्तरावर औषध खरेदीला परवानगी मागण्याचा निर्णयही झाला.
राज्यभरात हीच परिस्थिती
- उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी शासकीय रुग्णालयांना हाफकीन जीव औषधी महामंडळातर्फे औषध पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हाफकीनकडून औषध पुरवठ्यासंदर्भात वेळेवर नियोजन होत नसल्याचे वैद्यकीय अधिकाºयांचे म्हणणे आहे. यातून राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचेही या अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे यात शासनाने विशेष धोरण ठरविण्याची गरज आहे.