जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सोलापूर जिल्ह्यातील २६५ गावांत होणार १५ हजार ३५० कामे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:39 AM2017-11-15T11:39:16+5:302017-11-15T11:40:48+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानाचा २०१७-१८ चा आराखडा जिल्हा प्रशासनाने नुकताच विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानाचा २०१७-१८ चा आराखडा जिल्हा प्रशासनाने नुकताच विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. अर्थसंकल्पीय वर्षात सहा महिने लोटल्यानंतर आराखडा सादर होतोय. गेल्या वर्षीची काही कामे अपूर्ण आहेत. त्यानंतर यंदा १५ हजार ३५० कामांचा प्रस्ताव असून, त्यासाठी २४१ कोटी ९६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण राज्यातच अशी परिस्थिती आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत पुणे विभागातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. पुणे विभागात २०१५-१६, २०१६-१७ या कालावधीत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. शिवाय २०१७-१८ मधील प्रस्तावित कामांची माहिती घेतली जाणार आहे. या बैठकीपूर्वीच जिल्हा प्रशासनाने २०१७-१८ मधील कामांचा प्रस्ताव सादर केला आहे. मागील वर्षात विविध विभागाकडून ९९३३ कामे प्रस्तावित होती. यातील ९३०६ कामे पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत आहे. लघुपाटबंधारे आणि कृषी विभागाने करमाळा, बार्शी तालुक्यात केलेली कामे बोगस असल्याची चर्चा आहे. परंतु याबाबत तक्रार न आल्याने कारवाई झाली नसल्याचेही प्रशासनाकडून सांगत असले तरी आढावा बैैठकीत लोकप्रतिनिधी काय करतात याकडे लक्ष आहे.
---------------------------
आज आढावा, उद्या पाहणी
जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पुणे विभागातील कामांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला पुणे विभागातील पालकमंत्री, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर या योजनेत पुरस्कार पटकावणारे गावी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांचा गौरवही होणार आहे. उद्या गुरुवारी जलसंधारणमंत्री राम शिंदे आपल्या सोयीनुसार जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणीही करणार आहेत.
---------------------------
सर्वाधिक काम अक्कलकोट तालुक्यात होणार
जलयुक्त शिवार योजनेत उत्तर सोलापूर तालुक्यात ७, दक्षिण सोलापूर ३६, अक्कलकोट ५३, मोहोळ २७, माढा २१, करमाळा २४, बार्शी ४२, पंढरपूर १५, सांगोला १२, मंगळवेढा १०, माळशिरस १८ अशा २६५ गावांमध्ये कामे होणार आहेत. मागील वर्षाप्रमाणे यंदाही कपार्टमेंट बंडिंगसह २४ प्रकारची कामे होणार आहे. यंदा क्षेत्रीय उपचारांना प्राधान्य असेल. यातून १ लाख ५१ हजार ५५२ हेक्टर क्षेत्राला लाभ होण्याचा अंदाज आहे. २०१५-१६ मध्ये २८० गावात, २०१६-१७ मध्ये २६५ गावात कामे झाली होती. आजवर जिल्ह्यातील ७१ टक्के गावांची निवड झालेली आहे.