सोलापूर जिल्ह्यात होणार २२ लाख वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:35 AM2018-06-19T11:35:03+5:302018-06-19T11:35:03+5:30
सोलापूर: तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेत यंदा सोलापूर जिल्ह्यास १६ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले आहे; मात्र जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात २२.२६ लाख झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना त्यानुसार झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे.
राज्य शासनाच्या वनविभागाकडून गेली दोन वर्षे वृक्ष लागवड करण्याचे अभियान सुरु आहे. पहिल्या वर्षी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात जिल्ह्यात आठ लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली होती. सन २०१७ मध्ये झालेल्या अभियानात जिल्ह्यास पाच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते; मात्र एकूण उद्दिष्टापेक्षा जास्त झाडे लावण्याचा निर्धार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केला आहे. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील विविध यंत्रणांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे दहा लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट वनविभागाला देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ सामाजिक वनीकरण विभागास पाच लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
प्रमुख विभागनिहाय उद्दिष्ट
च्वनविभाग, (दहा लाख), सामाजिक वनीकरण (५ लाख), जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी (९० हजार),महानगरपालिका (८ हजार), सार्वजनिक बांधकाम विभाग (२० हजार),अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (२० हजार) सोलापूर विद्यापीठ (५० हजार), पोलीस आयुक्तालय शहर (१ हजार), पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण (३ हजार), सहायक आयुक्त, समाजकल्याण (३ हजार), जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आयुष अधिकारी, सोलापूर (४ हजार) कार्यकारी अभियंता, एमएसईबी (१ हजार), उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग (४ हजार), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (५ लाख १४ हजार ५००),राष्ट्रीय महामार्ग, सोलापूर (५ हजार ५८०) सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, सोलापूर (७ हजार ५००)