चिंता कायम; सोलापूर जिल्ह्याचा मृत्यूदर घसरला; मात्र राज्यात आजही अव्वल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:55 AM2020-07-24T10:55:58+5:302020-07-24T10:58:49+5:30
लॉकडाऊननंतरची स्थिती; मुंबई, पुणे, ठाणे शहरांच्या तुलनेत सोलापूर शहराचा मृत्यूदर तीन ते चार टक्क्यांनी जास्त
राकेश कदम
सोलापूर : जूनअखेर दहा टक्क्यांवर गेलेला जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर आता सहा टक्क्यांवर आला आहे. मात्र हा मृत्यूदरही आजच्या घडीला राज्यात सर्वाधिक असल्याचे दिसते. चिंतेची बाब म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे शहरांच्या तुलनेत सोलापूर शहराचा मृत्यूदर तीन ते चार टक्क्यांनी जास्त आहे.
मुंबई, पुणे शहरात मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळले. सोलापूर शहरात १२ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. एप्रिल आणि मे महिन्यात फारशी रुग्णवाढ दिसत नव्हती. २२ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचे ४८८ रुग्ण होते तर ३४ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूदर ६९८ टक्के होता. जून महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला.
१५ दिवसांतच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली. ७ जून रोजी जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर ८.६७ टक्के होता. पुन्हा १५ दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याची स्थिती होती. जिल्ह्याचा मृत्यूदर ८.५१ टक्क्यांवर होता. २७ जून रोजी जिल्ह्याचा मृत्यूदर दहा टक्क्यांवर होता. या दिवसांत मध्यप्रदेशातील झाशी पहिल्या क्रमांकावर तर पंचकुला दुसºया क्रमाकांवर होते. हा शहरांचा मृत्यूदर अनुक्रमे १०.७ टक्के आणि १०.४ टक्के तर सोलापूरचा मृत्यूदर १० टक्के असल्याचे वृत्त देशभरातील वेबसाईट्सवर प्रकाशित झाले होते. सात जुलै रोजी जिल्ह्याचा मृत्यूदर ८.९८ टक्के झाला. १५ दिवसांनंतर २२ जुलै रोजी मृत्यूदर ६.०२ टक्क्यांवर पोहोचल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. जळगाव जिल्हा दुसºया क्रमांकावर आहे.
मुंबईपेक्षा सोलापूर शहराचा मृत्यूदर अधिक
मुंबई शहरातील कोरोनाचा मृत्यूदर ५.६१ टक्के, पुण्याचा मृत्यूदर अडीच टक्के आहे. ठाणे शहराचा मृत्यूदर ३.३५ टक्के तर औरंगाबाद शहरातील मृत्यूदर ४.६३ टक्के आहे. एप्रिल आणि मे महिन्यात या शहरातील स्थिती चिंताजनक होती. परंतु, या शहरांमधील मृत्यूदर घटत असल्याचे दिसते. सोलापूर शहरातील मृत्यूदर २२ जुलै रोजी ८.२१ टक्के आहे. मुंबई हे दाट लोकवस्तीचे शहर मानले जाते. मुंबईपेक्षा सोलापुरातील वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय आहे.
प्रशासन काय म्हणते
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आरोग्य मंत्र्यांना दिलेल्या अहवालात काही कारणे नमूद केली आहेत. जिल्ह्यातील मृतांमध्ये ६० वर्षांवरील ६५ टक्के रुग्ण आहेत. हे रुग्ण अखेरच्या दिवसांत उपचारासाठी दाखल झाले. या रुग्णांना इतरही गंभीर आजार होते. दाट लोकवस्तीच्या भागातील नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांचा लवकर मृत्यू होतोय. यासाठी पालिकेने ज्येष्ठ नागरिकांची अँटिजेन टेस्ट मोहीम हाती घेतली असून, ज्येष्ठ नागरिकांवर दर आठ दिवसाला लक्ष ठेवले जाणार आहे.