सोलापूर विभागाच्या एसटीचेही स्टेअरिंग आता महिलांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 10:57 AM2020-01-23T10:57:16+5:302020-01-23T10:59:33+5:30
दोघींची निवड : प्रशिक्षण सुरू; आणखी पाच महिला चालक येणार
रूपेश हेळवे
सोलापूर : या २१ व्या शतकात असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही जिथे मुलींनी आपले अस्तित्व सिद्ध केले नाही. मग ते अंतराळात जायचं असो किंवा एसटी चालवायचे असो. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे़ राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागातही एसटी स्टेअरिंग महिलांच्या हाती असणार आहे. यासाठी दोन महिलांची निवड करण्यात आली आह़े सोलापूर विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटीची स्टेअरिंग आता महिला चालकांच्या हाती असणार आहे. दीक्षा भीमराव घुले आणि पूनम अशोक डांगे असे सोलापूर विभागात निवड झालेल्या महिला चालक कम वाहकांची नावे आहेत.
या दोघींनीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे क्षेत्र निवडले आहे़ २०१९ मध्ये झालेल्या एसटी भरतीमध्ये दोन मुलींनी सोलापूर विभागातून वाहक कम चालक पदासाठी अर्ज केला होता़ या मुलींची निवड झाली असून, त्यांना सध्या सोलापूर विभागात प्रशिक्षण देण्यात येत आहे. या महिलांना वाहक कम चालकाचे प्रशिक्षण असणार असून, हे जवळपास तीन महिन्यांपर्यंत असणार आह़े याचबरोबर त्यांना एक वर्षाचे आॅनरोड चालनाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
सोलापूर विभागात जवळपास साडेचार हजार कर्मचारी आहेत. यातील महिलांची संख्या कमी प्रमाणात आहे़ यामध्ये आता भर पडेल़ सध्या दोन महिलांचे प्रशिक्षण सुरू असून, येत्या आठवड्यामध्ये आणखी पाच महिला सोलापूर विभागात दाखल होतील़
असे असणार प्रशिक्षण
- या निवड झालेल्या महिला चालकांना तीन टप्प्यात एसटी विभागाच्या वतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे़ पहिल्या टप्प्यात जवळपास तीन महिन्यांचा वर्ग प्रशिक्षण असणार आहे़ त्यानंतर प्रत्यक्ष मार्ग प्रशिक्षण असणार आहे़ यामध्ये जवळपास शहराबाहेर १५० किलोमीटर चालन, शहरात ९५ किलोमीटरपर्यंत चालन असे प्रशिक्षण असणार आहे आणि वाहकाचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे़
सोलापूर विभागात पहिल्यांदाच चालक कम वाहक पदावर दोन महिला आलेल्या आहेत़ त्यांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे़ प्रत्येक महिलेला पंधरा दिवस चालन आणि पंधरा दिवस वाहकाचे काम प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर दिले जाईल़
- रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, सोलापूर
मला वाहन चालवण्याची आवड असल्यामुळे मी वाहक कम चालक पदासाठी सोलापूर विभागात अर्ज केले आणि माझी निवड झाली़ हा माझ्यासाठी सुखद धक्का होता़ यामध्ये मला कुटुंबीयांचे खूप सहकार्य मिळाले़ सोलापूर विभागात आल्यानंतर विभाग नियंत्रकांनीही आम्हाला चांगले मार्गदर्शन केले.
- पूनम डांगे, महिला चालक कम वाहक, सोलापूर
माझ्या घरची परिस्थिती खूप हलाखीची आहे़ आई, वडील, भाऊ हे टेलरिंगचे काम करतात़ पण मला गाडी चालवण्याची आवड आहे़ यामुळे या पदासाठी अर्ज केला आणि माझी निवड झाली़ यामध्ये माझ्या सर्व कुटुंबीयांनीही मला प्रोत्साहन दिले़ आज त्यांच्यामुळेच मी या पदावर चांगले काम करण्याची माझी जिद्द पूर्ण करेऩ
- दीक्षा घुले,
महिला वाहक कम चालक