Solapur: डॉक्टर तुम्ही सुद्धा... लाखाची लाच घेताना ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात
By विलास जळकोटकर | Updated: December 18, 2024 19:46 IST2024-12-18T19:46:11+5:302024-12-18T19:46:30+5:30
Solapur News: लॅबच्या तक्रारीचा अहवाल सकारात्मक पाठण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव विष्णूपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

Solapur: डॉक्टर तुम्ही सुद्धा... लाखाची लाच घेताना ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात
- विलास जळकोटकर
सोलापूर - लॅबच्या तक्रारीचा अहवाल सकारात्मक पाठण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव विष्णूपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी झालेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.
यातील तक्रारदाराची लॅब आहे. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत दाखल होणाऱ्या रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने तपासून रिपोर्ट सादर करण्याचे काम निविदेद्वारे मिळालेले होते. तक्रारदाराच्या लॅबच्या विरोधात आलेला तक्रारी अर्ज पुढील चौकशीसाठी डॉ. माधव जोशी यांच्याकडे होता.
या तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. जोशी यांनी तक्रारदारांना संपर्क साधून त्यांच्या लॅबच्या कामाबद्दल तक्रार प्राप्त झाल्याचे सांगून तुमच्या बाजूने अहवाल वरिष्ठाकडे पाठवतो असे सांगून तसेच लॅबविरोधात अहवाल पाठवल्यास महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे उर्वरित बील निघणार नाही, अशी भीती दाखवून त्यासाठी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी पडताळणी होऊन बुधवारच्या कारवाई झाली. सदर बझार पोलीस ठाण्यात रात्री भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे, उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रीराम घुगे, राजू पवार, सचिन राठोड, शाम सुरवसे यांनी केली.
आधी पडताळणी मग कारवाई
त्यानंतर डॉ. जोशी यांनी तडजोडी अंती १ लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे लाच लुचपतच्या पथकाने मंगळवारी केलेल्या पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी सापळा लावण्यात आला. यात पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये लाच स्वीकारल्याचे लाचलुचपत पथकाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.