Politics; सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळे नको; उमेदवार स्थानिकच हवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 02:44 PM2019-02-08T14:44:08+5:302019-02-08T14:46:23+5:30
सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळे हे बाहेरचे उमेदवार नको. गौडगाव मठाचे मठाधिपती श्री शिवाचार्यरत्न डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी ...
सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळे हे बाहेरचे उमेदवार नको. गौडगाव मठाचे मठाधिपती श्री शिवाचार्यरत्न डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांना उमेदवारी द्यावी, अशी भाजपच्या अनेक नेत्यांची मागणी आहे. तसे पत्र आम्ही भाजपच्या केंद्रीय समितीला पाठविण्यात आल्याचे माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मेंगजी म्हणाले, भाजपच्या केंद्रीय समितीने लोकसभेच्या उमेदवारीबाबत आजी-माजी आमदार आणि खासदारांकडून मते मागविली आहेत. माझे मत नोंदविताना मी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा केली. खासदार शरद बनसोडे यांच्यामुळे आमची आधीच अडचण झाली आहे. ते सोलापुरात येतात कधी आणि जातात कधी हे कळत नाही. दिल्लीत काही कामे असली की कार्यकर्त्यांची अडचण होते. त्यात पुन्हा शरद बनसोडे यांच्याऐवजी खासदार अमर साबळे यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येत आहे.
अमर साबळे निवडून आले तर पुन्हा भाजपच्या कार्यकर्त्यांची अडचण होईल. त्यांना शोधायला बारामती किंवा दिल्लीत जावे लागेल. त्याऐवजी डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांना उमेदवारी दिल्यास सगळीच अडचण दूर होणार आहे. सोलापूर उत्तर, मध्य, दक्षिण, अक्कलकोट, मंगळवेढा या भागातून त्यांना सर्वाधिक मतदान होईल. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपक्षा कमी खर्चात ते निवडून येतील. सुशीलकुमार शिंदे यांना कायमचे रोखले जाईल. महास्वामींच्या उमेदवारीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा पाठिंबा आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक महास्वामींच्या बाजूने आहेत, असा दावाही त्यांनी केला.
महास्वामींच्या जातवैधता प्रमाणपत्राची खात्री केली
- मेंगजी म्हणाले, सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारे जातवैधता प्रमाणपत्र आहे. भाजपच्या केंद्रीय समितीतील काही लोकांनी त्याची खात्री करुन घेण्यास सांगितले होते. त्यानुसार खात्री करुन घेण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच यात लक्ष घातल्यामुळे महास्वामींच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होईल,असे वाटते. स्थानिक उमेदवारामुळे मतदारांना निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.