Solapur: घरात छापा टाकून लाख रूपयाच्या देशी-विदेशी दारूचा साठा जप्त, एकास अटक
By संताजी शिंदे | Published: July 13, 2024 07:24 PM2024-07-13T19:24:11+5:302024-07-13T19:24:28+5:30
Solapur News: बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी व घोळवेवाडी या गावातील दोन घरांमध्ये छापा टाकून, एक लाख सहा हजार ५० रूपये किंमतीचा देशी-विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
- संताजी शिंदे
सोलापूर - बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी व घोळवेवाडी या गावातील दोन घरांमध्ये छापा टाकून, एक लाख सहा हजार ५० रूपये किंमतीचा देशी-विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी या गावातील प्रमोद महादेव घोळवे याच्या त्रिमूर्ती निवास या राहत्या घरात छापा टाकण्यात आला. छाप्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी दारूच्या १४६ बाटल्या, विदेशी दारूच्या विविध ब्रॅंडच्या २४८ बाटल्या, बियरच्या ५९ बाटल्या असा एकूण ६७ हजार ११० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद घोळवे याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
अन्य एका कारवाईत पथकाने घोळवेवाडी (ता.बार्शी) येथील विवेक महादेव घोळवे याच्या दत्तकृपा या राहत्या घरात छापा टाकला. घरातून देशी दारूच्या १४४ बाटल्या व विदेशी दारूच्या ११० बाटल्या व ५५ बियरच्या बाटल्या असा ३८ हजार ९४० रुपये किमतीचा दारु साठा जप्त केला. आरोपी विवेक महादेव घोळवे याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद, अंजली सरवदे, संगीता जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, योगीराज तोग्गी, इस्माईल गोडीकट, चेतन व्हनगुंटी, वाहनचालक रशीद शेख व संजय नवले यांच्या पथकाने पार पाडली.
वारीच्या अनुषंगाने सहा पथके तयार
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात हातभट्टी दारु ठिकाणे, धाबे हॉटेलवर छापे टाकण्यात येत आहेत. आषाढी वारीच्या अनुषंगाने सहा पथके तयार करण्यात आली आहेत. पालखी मार्गावरील तसेच पंढरपूर शहर परिसरातील अवैध दारू ठिकाणांवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी परिसरातील अवैध दारूधंद्याची माहिती द्यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.